Bengal Howarh Fire । पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील उलुबेरिया येथे लक्ष्मीपूजनाच्यावेळी घराला आग लागल्याने तीन जनांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उलुबेरिया नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 27 मधील बनीताला येथे घडली. माहिती मिळताच उलुबेरिया पोलीस ठाण्याचे पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी गेले.
मिळलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये तानिया मिस्त्री (11), इशान धारा (3) आणि मुमताज खातून (5) यांचा समावेश आहे. या अपघातात मनीषा खातून यांच्यासह दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना बनितला येथील उलुबेरिया फ्लायओव्हरजवळ घडली. स्थानिक रहिवासी काजल मिस्त्री यांच्या घरात काही मुले घराच्या आतील बाजूस फुलझडी पेटवत होते. त्याचवेळी स्पार्कलरची ठिणगी घरातील सामानावर पडल्याने घराला आग लागली.
घरातील आगीतून मुले बाहेर पडू शकली नाहीत
ती तीन मुले घराबाहेर पडू शकली नाहीत. दरम्यान, आग लागल्यानंतर शेजाऱ्यांनी बादल्यांनी पाणी ओतण्यास सुरुवात केली. मात्र आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. आग पसरू लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली मात्र ते तीन मुले गंभीर जखमी झाले होते.
त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिन्ही मुलांना मृत घोषित केले. दोघांवर गंभीर अवस्थेत उलुबेरिया मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
घरात ठेवलेल्या फटाक्यांमुळे आग लागली
स्थानिक लोकांनी सांगितले की, त्या घरात मोठ्या प्रमाणात फटाके ठेवण्यात आले होते, त्यामुळे आग वेगाने पसरली. आग लगतच्या दुकानातही पसरली आहे. त्या घरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा का करण्यात आला होता, याचाही तपास पोलीस करत आहेत.
उलुबेरिया घटनेवर राज्यमंत्री पुलक रॉय म्हणाले की, ‘ही अत्यंत दुःखद घटना आहे. आम्ही सर्व कुटुंबासोबत आहोत. जळालेल्या व्यक्तीला चांगल्या उपचारासाठी कोलकाता येथे पाठवण्यात आले आहे. हावडा ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती बंगालिया यांनी सांगितले की, स्पार्कलर पेटवताना तीन मुलांचा जळून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची चौकशी केली जाईल.