सुखाची झोप मोलाचीच (भाग 2)

डाॅ. वैशाली माने

आयुर्वेदाने आपल्या आयुष्याचे तीन आधारस्तंभ सांगितले आहेत. 1) आहार, 2) निद्रा, 3) ब्रह्मचर्य.
या तीन आधारस्तंभांपैकी एक निद्रा म्हणजेच झोप याची आज माहिती घेऊया.

अतिप्रमाणात झोपणे किंवा अतिशय कमी प्रमाणात झोपणे किंवा वेळी अवेळी झोपणे हे आरोग्य व आयुष्य यांची हानी करण्याविषयी जशा काय दुसऱ्या कालरात्रीच आहेत. त्यामुळे आरोग्य प्राप्तीची इच्छा असणाऱ्या मनुष्यांनी हे टाळावे. निद्रा ही योग्य प्रकारेच घेतली गेली तर मनुष्यास सुखी आयुष्य प्राप्त होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिवसा कोणी झोपावे :

दिवसा झोपू नये हे जरी खरे असले तरी त्यालाही काहीजण अपवाद असतात. खूप बारीक, अशक्‍त व्यक्‍ती, लहान मुले, म्हातारी माणसे, शरीराने किंवा मनाने अतिशय थकलेले, अजीर्ण झालेले, थुंकीतून रक्‍त पडणारे रुग्ण किंवा रक्‍ताच्या उलट्या होणारे रुग्ण, जुलाब, उचकी, मार लागलेले, रात्री जागरण केलेले, अतिशय राग, भीती, शोक करणारे तसेच ज्यांना रोज दिवसा झोपण्याची सवय आहे अशा व्यक्‍तींनी दुपारी झोपले तरी चालते. तसेच ग्रीष्म ऋतूत दिवस मोठा व रात्र अतिशय लहान असल्याने फक्‍त ग्रीष्म ऋतूतच दिवसा झोपावे इतर ऋतूत दिवसा झोपू नये.

दिवसा कोणी झोपू नये?

ज्यांच्या शरीरात चरबी फार आहे. म्हणजे स्थूल व्यक्‍ती, नेहमी भरपूर प्रमाणात तेल, तूप खाणाऱ्या व्यक्‍ती, घश्‍याचे आजार असणाऱ्या व्यक्‍ती, कफाचे आजार असणाऱ्या व्यक्‍ती, ज्यांना विषबाधा झालेली आहे अशा व्यक्‍तींनी दिवसा झोपू नये.
दिवसा झोपू नये असे सांगितलेल्या व्यक्‍तींनी जर दिवसा झोप घेतली तर त्यांना डोकेदुखी, अंग जड होणे, भूक मंदावणे, मळमळणे, सर्दी, अंगदुखी, खोकला, गळ्याचे आजार, अंगावर गांध्या येणे किंवा सतत अंग खाजविणे, सूज येणे, संपूर्ण अंग ओल्या कापडाने गुंडाळल्याप्रमाणे वाटणे, सतत डोळ्यावर झापड येणे, ताप येणे ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता कमी होणे, योग्य काय आणि अयोग्य काय याचा सारासार विचार न होणे असे आजार होतात.

काही व्यक्‍ती झोप आली असतानादेखील उगाचच जागरण करतात. अशा प्रकारे झोप मोडली असता डोके, डोळे जड होतात, आळस येतो, जांभया येतात, अंग मोडून येते, सतत गुंगीत असल्याप्रमाणे वाटते इत्यादी लक्षणे जाणवतात. काही व्यक्‍तींना निद्रानाश हा आजार जडलेला असतो. झोपेची आराधना करूनदेखील झोप गायबच! 24 तासांत अर्धा ताससुद्धा झोप नाही एवढा निद्रानाश!!

निद्रानाशाने डोके जड होणे, आळस, चक्कर, अपचन, वाताचे आजार, वारंवार जांभया येणे, अंगदुखी, गळून गेल्याप्रमाणे वाटणे हे आजार होतात. झोपेच्या या सगळ्या विचारमंथनामध्ये ज्याला जितकी सवय असेल तितकी रात्री झोप आपल्या हित, अहिताचा विचार करून पुरेशी घेणे आवश्‍यक असते… नुसते आवश्‍यकच नाही तर हे त्यांचे कर्तव्यच आहे.

सुखाची झोप मोलाचीच (भाग 1)            सुखाची झोप मोलाचीच (भाग 3)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)