सुखाची झोप मोलाचीच (भाग 1)

डाॅ. वैशाली माने

आयुर्वेदाने आपल्या आयुष्याचे तीन आधारस्तंभ सांगितले आहेत. 1) आहार, 2) निद्रा, 3) ब्रह्मचर्य.
या तीन आधारस्तंभांपैकी एक निद्रा म्हणजेच झोप याची आज माहिती घेऊया.

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस रात्री झोपायला जातो तेव्हा त्यास झोप आलेली नसते आणि सकाळी उठतो (की उठवला जातो!) त्यावेळी त्याची झोप पूर्ण झालेली नसते. रात्रीची झोप यावी म्हणून झोपेची गोळी! अन्‌ सकाळी जाग यावी म्हणून नगारेरूपी गजर!! रात्रीची झोप लागते न लागते तोच स्वप्नांचे थैमान किंवा वारंवार लघवीला उठावे लागते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परत झोपले तर कधी पटकन झोप लागते किंवा कधी तासन्‌तास झोपेची वाट बघावी लागते. पहाटे-पहाटेची झोप लागली की परत उठण्याची वेळ आलेली असते की असं वाटतं आताच तर झोपलो होतो! काहीजणांची तर कधी चिंतेमुळे तर कधी अति आनंदामुळे झोप उडालेली असते. एकूण मिळूनच झोपेचे खोबरे झालेले असते.

प्रकृती, प्रकृतीप्रमाणे ही झोपेमध्ये थोडाफार फरक जाणवतो. कफप्रकृतीच्या व्यक्‍तीस इतरांच्या मानाने जास्त झोप लागते. तसेच कफ प्रकृतीची माणसे ढाराढूर झोपतात. त्यांना कोणीतरी उठवावे लागते.

पित्तप्रकृतीची माणसे मर्यादित प्रमाणात झोपतात. आणि झोप पूर्ण झाली की स्वतःहून उठतात. त्यांना कुणी उठवावे लागत नाही. तर वात प्रकृतीच्या व्यक्‍तींची झोप म्हणजे कावळ्याची झोप, अतिशय थोडी असते आणि थोड्याशा झोपेतदेखील वारंवार जागे होतील.

झोपेविषयी अधिक माहिती घेण्यापूर्वी स्वस्थ, निरोगी व्यक्‍तीने कधी उठावे याची आधी माहिती घेऊया.

ब्रह्मेमुहुर्ते उत्तिष्ठेत्क्वस्थो रक्षार्थमायुषः।

निरोगी, स्वस्थ्य मनुष्याने रोज पहाटे ब्राह्म मुहुर्तावर उठावे. त्यामुळे आयुष्याचे रक्षण होते.
स्वस्थ्य मनुष्यी म्हणजेच आयुर्वेदानुसार दिनचर्या पाळणाऱ्या मनुष्याची झोप कशी छान असते. रात्री वेळेवर आपोआप झोप येते. पहाटे कोणीही न उठवता आपोआप जाग येते आणि विशेष म्हणजे उठल्यावर प्रसन्न, हलके, ताजेतवाने वाटते. दिवसा किंवा दुपारच्या जेवणानंतर साधी पेंगदेखील येत नाही. झोपेचे पूर्णपणे समाधान लाभले असते. चरक ऋषींनी झोपेचे महत्त्व सांगताना दोन अत्यंत सुंदर श्‍लोक सांगितले आहेत.

निद्रायत्ते सुखं दुःखं पुष्टीः
कार्श्‍य बात्रम्‌ अबलम्‌।
वृषता क्‍लिबता ज्ञानं अज्ञानं जीवितं न च।।

अर्थ : यथाविधी झोप घेतल्याने शारीरिक तसेच मानसिक सुख, शरीराची पुष्टी, बलवृद्धी, वीर्यवृद्धी, ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता वाढणे आणि दीर्घ जीवनाची प्राप्ती होणे हे लाभ होतात. याउलट शास्त्र नियमांच्या विरुद्ध झोप घेतल्याचे दुःख, कृशता, दौर्बल्य, क्‍लैब्य, अज्ञान आणि मृत्यू देखील येऊ शकतो.

देहवृत्तौ यथा आहार तथा स्वप्नः सुखथो मतः।
स्वप्न आहार समुत्येच स्थौल्य कार्श्‍य विशेषतः।।

अर्थ : देहधारणाकरिता किंवा उत्तम स्वास्थ्य प्राप्तीसाठी योग्य मात्रेमध्ये आहार आमि योग्य प्रमाणात निद्रा घेणे हे सुखकारक आहे. तर अतिप्रमाणात आहार आणि झोप घेतली तर स्थूलता/स्थौल्य येते. अतिशय कमी प्रमाणात आहार व निद्रा घेणाऱ्यास कृशता/अतिबारीकपणा येतो.

सुखाची झोप मोलाचीच (भाग 2)          सुखाची झोप मोलाचीच (भाग 3)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)