म्युच्युअल फंडातील एसआयपीचे फायदे

म्युच्युअल फंड हे एक आर्थिक गुंतवणुकीचे साधन आहे. विविध कंपन्यांच्या म्युच्युअल फंडांच्या अनेक योजना असतात. तुम्ही ज्या योजनेत पैसे गुंतवता त्या योजनेत इतरही अनेकजणांनी पैसे गुंतवलेले असतात. अशा प्रकारे सगळ्यांचे पैसे एकत्रित होतात. ते पैसे नंतर फंड मॅनेजर शेअरमध्ये किंवा कर्जरोख्यांमध्ये किंवा दोन्हींमध्ये गुंतवणूक केली जाते. 

तुम्ही कोणत्या प्रकारातील योजना निवडली आहे त्यानुसार शेअर आणि कर्जरोख्यातील गुंतवणुकीचे प्रमाण ठरत असते. म्युच्युअल फंडाच्या योजनेतील एकत्रित रक्कम शेअरमध्ये/कर्जरोख्यांमध्ये गुंतवल्यानंतर तिचे विभाजन युनिटमध्ये केले जाते. तुम्ही गुंतवलेल्या रकमेच्या प्रमाणात अशी युनिट तुम्हांला मिळतात. या युनिटची किंमत नेट असेट व्हॅल्यूमध्ये (एऩएव्ही) मोजले जाते. एनएव्हीच्या भावानुसार तुम्ही युनिटची खरेदी-विक्री करू शकता.

एसआयपीचे काम कसे चालते?
एसआयपी ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. तुम्ही निश्चित केलेली एक रक्कम ठरलेल्या काळाने म्युच्युअल फंडात गुंतवत राहता. हा कालावधी साधारणपणे दर महिन्याला असा असतो. दर महिन्याच्या तुम्ही निश्चित केलेल्या तारखेला तुमच्या खात्यातून तुम्ही ठरवलेली रक्कम वजा होऊन ती म्युच्युअल फंडातील तुमच्या खात्यात जमा होते. हा कालावधी दर आठवड्याला, दर तीन महिन्यांनी असाही असू शकतो.

त्यासाठी तुम्ही ईसीएस म्हणजेच इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्‍लिअरिंग सिस्टिमला तसे सांगितलेले असावे लागते. तुम्ही ईसीएसला आदेश दिलेला असल्याने दरमहा तुमच्या खात्यातून ठरलेल्या तारखेला ईएमआय जसा वजा होतो तशाच पद्धतीने तुमच्या बॅंक खात्यातून तुमच्या म्युच्युअल फंड खात्यामध्ये ही रक्कम जमा होत राहते. तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंड कंपनीच्या विशिष्ट योजनेतील त्या दिवशीचा जो एनएव्ही असतो त्या भावाने तुमच्या पैशातून तुमच्या नावावर युनिट जमा केली जातात.

म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापन अतिशय व्यावसायिक पद्धतीने केले जाते. त्यामध्ये गुंतवणूक करण्याचे एक साधन म्हणजे एसआयपी. एसआयपी साधारणपणे म्युच्युअल फंडाशी जोडली गेली असली तरी हीच पद्धत तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरू शकता.
तुम्ही सदनिका किंवा गाडी खरेदीसाठी मोठ्या रकमेचे कर्ज घेता आणि मग दर महिन्याला ईएमआयद्वारे ते फेडत राहता. त्याच्या उलट म्हणजे एसआयपी.

या साधनाद्वारे तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक करत राहता. शेअर व कर्जरोखे बाजारातील चढ-उतारानुसार तुमच्या गुंतवणुकीवर परतावा मिळत जातो आणि पाच, सात, दहा वर्षांच्या काळात मोठी रक्कम तुमच्या नावावर जमा होते. ज्याद्वारे तुम्ही तुमची आर्थिक उद्दीष्टे साध्य करू शकता.

एसआयपीमुळे कसा फायदा होतो?
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची ही एक स्मार्ट आणि कुठलीही झंझट नसलेली पद्धत आहे. एसआयपीद्वारे तुम्ही निश्चित, ठराविक किंवा आधी निश्चित केलेली रक्कम नियमित कालावधीला भरू शकता. एसआयपीद्वारे दोन फायदे होतात. रुपयाचे सरासरी मूल्य आणि

चक्रवाढ पद्धतीचा फायदा –
रुपयाचे सरासरी मूल्य एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मार्केट सुरु असण्याची वाट पहावी लागत नाही. रुपयाच्या मूल्यानुसार त्या हिशेबात सरासरी युनिट प्रत्येकवेळी मिळत असल्याने अंदाज बांधण्याचा खेळ खेळत बसावा लागत नाही. एसआयपीद्वारे नियमित गुंतवणूक होत असल्याने जेव्हा एनएव्ही कमी असते तेव्हा जास्त युनिट मिळतात आणि एनएव्ही जास्त असेल तर कमी युनिट मिळतात. त्यामुळे एसआयपी ही गुंतवणुकीची जबरदस्त पद्धत आहे असे म्हटले जाते.

विशेषतः शेअर मार्केट खाली असेल तेव्हा तुम्ही जास्त युनिट खरेदी करू शकता आणि त्यातून तुमचा पैसा काळाच्या ओघात वाढत जातो. चक्रवाढीचे बळ – तुम्ही जेव्हा एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये गुंतवणूक करता तेव्हा त्यावर मिळणारा परतावा पुन्हा तुमच्या नावावर गुंतवला जातो आणि हा चक्रवाढीचा फायदा दीर्घकाळात मोठी रक्कम जमा करण्यास उपयुक्त ठरतो. एसआयपीतील फायदा पुन्हा पुन्हा गुंतवला जावा आणि त्यातून चक्रवाढीचा फायदा मिळून दीर्घकाळात मोठा फायदा मिळावा यासाठी एसआयपीद्वारे दीर्घकाळाची गुंतवणूक करणे आवश्‍यक असते.

तुम्ही कर्जाचा हप्ता म्हणून दर महिन्याला ईएमआय भरता. त्याच पद्धतीने सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून दरमहा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. हे कसे घडते हे पाहणे मोठे रंजक ठरते. साधारणपणे म्युच्युअल फंड आणि एसआयपी हे दोन शब्द गुंतवणूकदाराच्या कानावर एकत्रित पडत असतात आणि स्वाभाविकपणे तो त्या दोन शब्दांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत राहतो. मग हे सगळे सिस्टिमॅटिक कसे आहे हे त्यातून कुठेच कळत नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि एसआयपी केल्यामुळे काळाच्या ओघात तुम्हांला तुमची आर्थिक उद्दीष्टे कशी साध्य करता येतात याची माहिती घेणे आवश्‍यक ठरते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.