तुम्ही दररोज ‘बदाम’ खाताय, तर ही बातमी नक्की पाहा

बदामाला सुक्या मेव्यात फार महत्त्वाचे स्थान आहे. हा बदाम आपल्यापर्यंत येतो तरी कसा ?
हा बदाम बाग-बगिचांमध्ये लावला जातो. बदामाच्या झाडाची पाने किंचित लालसर गुलाबी रंगाची असतात. काही पाने कात्र्याकात्र्याची असतात, तर काही झाडाची पाने भाल्याच्या आकाराची असतात. भारतात देशी बदाम लावले जातात. त्यांची झाडे उंच आणि सुंदर असतात. झाडाची उंची सुमारे चाळीस ते ऐंशी फुटाएवढी असते आणि पाने सहा ते आठ इंचाइतकी रुंद असतात.
काश्मीरसारख्या थंड भागात बदामाचे पुष्कळ उत्पन्न निघते. भारताशिवाय मस्कद, आराकान, इराक, मक्का, मदिना व सिरालसारख्या ठिकाणीही बदाम पुष्कळ प्र्रमाणात होतात. या फळाच्या बीलाही “बदाम’ म्हणतात. सुक्या मेव्यामध्ये पोषक घटक खूप प्रमाणात असतात
बदामाच्या जाती आणि त्यांचे आरोग्याला उपयोग:
बदामात मुख्यत: कडू व गोड अशा दोन जाती असतात. बदामाची एक जंगलीही जात असते. या फळात सारक गुण असतो. मोठे बदाम शीतल व पौष्टिक असतात आणि तेच खाण्यासाठी वापरले जातात.
कडू बदाम अत्यंत कडवट असतात. कडू बदामाच्या तेलाचा उपयोग मलम बनविण्यासाठी होतो. भारतापेक्षा अरबस्तानाचे बदाम अधिक पौष्टिक व मृदू असतात. वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांमध्ये बदाम वापरले जातात. ते मेंदूला व नेत्रांना पुष्टी देतात. मेंदूचा कमजोरपणा घालविण्यासाठी बदाम अत्यंत उत्तम असतात. बदामामुळे स्मरणशक्तीही वाढते. नजर कमी झाली असता बदाम-तूप व साखर एकत्रित करून ते आंबवून खाण्याची प्रथा आहे.
थंडीमध्ये बनविण्यात येत असलेल्या पाकांमध्ये स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यात खास करून बदामाचा उपयोग केला जातो. कॉडलिव्हरप्रमाणे बदामाचे तेल क्षयरोगात फायदेशीर असते.
बदामाचे फळ डोळ्याच्या आकाराचे असल्याने व बदाम वायुनाशक असल्यामुळे बदामाला अनुक्रमे “नेत्रोपमफल’ व “वातशत्रू’ असे म्हणतात.बदाम गरम, स्निग्ध, वायूनाशक, वीर्यवर्धक व पचण्यास जड असतात. बदामाचा गर्भ मधुर, वीर्यवर्धक, पित्त व वायुनाशक, तसेच वीर्य वर्धन करणारा असतो. पित्त व वायुहारक, स्निग्ध व उष्ण असतात. तो कफकारक असतो. बदामाचे शरीराला अनेक उपयोग असतात. बदाम वेगवेगळ्या रुपाने पोटात गेले पाहिजे…
बदामाची खीर : बदाम रात्री भिजत घालावेत, सकाळी त्याची साले काढून टाकावीत. नंतर ते चांगले वाटून दुधात कालवून दूध उकळून त्याची खीर बनवावी. (बदामाची खीर वरचेवर उकळू नये. उकळल्याने त्यातील पाचक घटक नष्ट होतात.) बदामाची खीर पाचक व उत्त्तेजक असते. याशिवाय मस्तकाची दुर्बलता, मस्तकशूल व डोकेदुखी या विकारांवर बदामाची खीर अत्यंत हितावह असते. बदामाच्या खिरीचे प्रमाण 20 ते 30 ग्रॅम एवढेच आहारात हवे.
बदाम-खव्याचे लाडू : 400 ग्रॅम बदामाचा गोळा, 100 ग्रॅम खवा, 600 ग्रॅम साखर, चारशे ग्रॅम तूप, 40 ग्रॅम े बिहिदाणे, दोनशे ग्रॅम कमळकाकडीचे मगज, वेलची, तमालपत्र व नागकेशर दहा ग्रॅम घेऊन, लवंग, वासकपूर,जायफळ, जायपत्री व केशर पाच पाच ग्रॅम घ्यावे.
बदामाचा गोळा एक तासभर पाण्यात भिजत घालावा, त्याची साले काढून टाकावीत व मग तो गोळा बारीक वाटावा. नंतर तो गोळा व खवा वेगवेगळा तुपात भाजावा. यानंतर साखरेचा पाक करुन त्यात वरील सर्व औषधाचे चूर्णकरुन कालवावे. मग बदामाचा गोळा व खवा घालून त्याचे लहान-लहान लाडू बनवावेत. रोज सकाळी एक लाडू खाऊन त्यावर दूध प्यायल्याने खूपच फायदा होतो व तापानंतर आलेला अशक्तपणा दूर होतो. थंडीमध्ये बदामाचे हे लाडू अत्यंत हितावह व शक्तिदायक ठरतात.
बदामाची पेज : बदाम गरम पाण्यात भिजत घालून नंतर वरची साल काढून टाकून पाण्यात वाटावेत. हा वाटलेला गोळा दुधात कालवून, उकळून त्याची खीर बनवावी, या खिरीमध्ये साखर व तूप घालून खाल्ल्याने बलवृदधी व वीर्यवृद्धी होते. तसेच मेंदू सशक्त बनतो व स्मरणशक्ती वाढते.
बदाम गरम पाण्यात भिजवून त्याची साले काढावीत. नंतर हे बदाम, अश्वगंधा व पिंपळी समभाग घेऊन बारीक कुटून दुधात ते कालवावे व खीर बनवावी. नंतर खिरीत तूप व साखर घालून ती जिचा चेहरा फिकट झाला आहे, व जी कंबर दुखीने व प्रदररोगाने त्रासली आहे अशा स्त्रीला खाऊ घातल्याने खूप फायदा होतो. त्यामुळे प्रदररोग नष्ट होतो व स्त्रीचे अंगावरचे दुध वाढण्यास मदत होते.
बदामलेप : बदाम व कापूर दुधात उगाळून मस्तकावर त्याचा लेप केल्याने मस्तकशूळ व शिरदर्द हे विकार बरे होतात. बदामाच्या तेलाचे मस्तकावर मर्दन केल्यास डोके शांत होते. बदाम उगाळून लेप केल्याने अंगावर बिब्बा उठला असेल तर तोही दूर होतो.
बदामावरील फोलकटे जाळून त्याचा कोळसा करून त्याची 100ग्रॅम पूड करून घ्यावी, त्यात लहान वेलचीचे दाणे, तुरटी व कापूर अनुक्रमे 10-10 ग्रॅम घालून त्याचे चूर्ण करून बारीक कुटून दंतमंजन करावे. या दंतमंजनाने दात स्वच्छ होतात व हिरड्या मजबूत बनतात.
कडू बदाम काळजीपूर्वक वापरावेत..
कडू बदामात एक प्रकारचे तीव्र विष असते, त्यामुळे कडू बदाम अत्यंत विषारी असतो या बदामाचे सेवन न करण्याची काळजी घ्यावी. रक्त पित्ताचा विकार असणाऱ्यासाठी बदाम हितावह ठरत नाहीत. बदाम खावेत पण काळजीपूर्वक. प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म लक्षात घेऊनच त्याचा उपयोग आयुर्वेदात केला जातो. बदामात भरपूर प्रमाणात प्रथिने ,कॅलशियम, फायबर, मॅगनेशियम, पोटॅशियम, इ. महत्वाचे घटक असतात.
बदामात जरी जीवनावश्यकमेद असला तरी तो हृदयाला घातक नसतो उलट फोलिक व अमिनो ऍसिड चांगल्या प्रमाणात मिळत असल्याने कॉलेस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रणात राहते. रोज आहारात म्हणून तर बदाम असावा. जो आयुर्वेदाने महत्त्वाचा मानला आहे. कर्करोग, मधुमेह व अल्झायमर्स या रोगाची शक्यता कमी होते. बदाम भिजवून त्याची मिक्सरमधून पेस्ट करावी व हि पेस्ट दुधात घालावी साखर वेलदोडा आणि केशर घालून आशा पद्धतीने तयार केलेली बदामाची खीर ही बलदायी आहे. चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी बदाम तेलाने मसाज करावा. तारूण्य मिळवून देणारा हा बदाम किमान रोज एक तरी खावा.





