बदामाचे फायदे आणि भिजवूनच का खावे बदाम?

बदामाला सुक्‍या मेव्यात फार महत्त्वाचे स्थान आहे. वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांमध्ये बदाम वापरले जातात. ते मेंदूला व नेत्रांना पुष्टी देतात. मेंदूचा कमजोरपणा घालविण्यासाठी बदाम अत्यंत उत्तम असतात.

बदामामुळे स्मरणशक्तीही वाढते. नजर कमी झाली असता बदाम-तूप व साखर एकत्रित करून ते आंबवून खाण्याची प्रथा आहे. थंडीमध्ये बनविण्यात येत असलेल्या पाकांमध्ये स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यात खास करून बदामाचा उपयोग केला जातो. कॉडलिव्हरप्रमाणे बदामाचे तेल क्षयरोगात फायदेशीर असते. बदाम वेगवेगळ्या रुपाने पोटात गेले पाहिजे…

बदामाची खीर

बदाम रात्री भिजत घालावेत, सकाळी त्याची साले काढून टाकावीत. नंतर ते चांगले वाटून दुधात कालवून दूध उकळून त्याची खीर बनवावी. बदामाची खीर पाचक व उत्त्तेजक असते. याशिवाय मस्तकाची दुर्बलता, मस्तकशूल व डोकेदुखी या विकारांवर बदामाची खीर अत्यंत हितावह असते. बदामाच्या खिरीचे प्रमाण 20 ते 30 ग्रॅम एवढेच आहारात हवे.

बदाम-खव्याचे लाडू

400 ग्रॅम बदामाचा गोळा, 100 ग्रॅम खवा, 600 ग्रॅम साखर, चारशे ग्रॅम तूप, 40 ग्रॅम े बिहिदाणे, दोनशे ग्रॅम कमळकाकडीचे मगज, वेलची, तमालपत्र व नागकेशर दहा ग्रॅम घेऊन, लवंग, वासकपूर,जायफळ, जायपत्री व केशर पाच पाच ग्रॅम घ्यावे.

बदामाचा गोळा एक तासभर पाण्यात भिजत घालावा, त्याची साले काढून टाकावीत व मग तो गोळा बारीक वाटावा. नंतर तो गोळा व खवा वेगवेगळा तुपात भाजावा. यानंतर साखरेचा पाक करुन त्यात वरील सर्व औषधाचे चूर्णकरुन कालवावे. मग बदामाचा गोळा व खवा घालून त्याचे लहान-लहान लाडू बनवावेत. रोज सकाळी एक लाडू खाऊन त्यावर दूध प्यायल्याने खूपच फायदा होतो व तापानंतर आलेला अशक्तपणा दूर होतो. थंडीमध्ये बदामाचे हे लाडू अत्यंत हितावह व शक्तिदायक ठरतात.

बदामाची पेज :

बदाम गरम पाण्यात भिजत घालून नंतर वरची साल काढून टाकून पाण्यात वाटावेत. हा वाटलेला गोळा दुधात कालवून, उकळून त्याची खीर बनवावी, या खिरीमध्ये साखर व तूप घालून खाल्ल्याने बलवृदधी व वीर्यवृद्धी होते. तसेच मेंदू सशक्‍त बनतो व स्मरणशक्ती वाढते.
बदाम गरम पाण्यात भिजवून त्याची साले काढावीत. नंतर हे बदाम, अश्‍वगंधा व पिंपळी समभाग घेऊन बारीक कुटून दुधात ते कालवावे व खीर बनवावी. नंतर खिरीत तूप व साखर घालून ती जिचा चेहरा फिकट झाला आहे, व जी कंबर दुखीने व प्रदररोगाने त्रासली आहे अशा स्त्रीला खाऊ घातल्याने खूप फायदा होतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.