पुणे – पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार लिंक करण्याचे काम पूर्णत्वाच्या दिशेने असताना आधार लिंक झालेल्या लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे अद्याप प्राप्त झालेले नाही. अर्ज भरताना अनेक खातेधारकांचे बॅंक खाते क्रमांक चुकीचे असल्याचे समोर आले असून त्याबाबत दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रामुख्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील खातेधारकांचे नंबर चुकीचे नमूद केल्याचे समोर आले आहे.
देशातील अल्पभूधारकांसाठी केंद्र शासनातर्फे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे दरवर्षी 6 हजार रुपये देण्यास सुरुवात केली आहे. दोन हजाराप्रमाणे वर्षभरात तीन हप्त्यांप्रमाणे सहा हजार रुपये लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर जमा होत आहे. सर्वत्र तिसऱ्या हप्त्याचे वितरण सुरू असताना शासनाने तिसऱ्या हप्त्याच्या लाभासाठी प्रथम योजनेला आधार लिंक अनिवार्य केले. जिल्ह्यात दोन हप्ते वितरीत केले असून तिसऱ्या हप्त्यासाठी आधार लिंक करण्यासंदर्भात 14 तालुक्यांत मंडलनिहाय तलाठी आणि तहसिल कार्यालयात केंद्र सुरू केले आहेत.