नवी दिल्ली – भारताची ऑलिम्पिकपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यंदाच्या मोसमात सुरू होत असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सज्ज झाली आहे. आगामी काळात होत असलेल्या विविध स्पर्धांमुळे माझ्यासह सर्व खेळाडूंना ऑलिम्पिकच्या तयारीसाठी लाभ होणार आहे, असेही सिंधूने सांगितले.
पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या तीन स्पर्धासाठी प्रशिक्षक आणि फिजिओ यांनासुद्धा सोबत घेऊन जाण्याची सिंधूला भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) तसेच भारतीय बॅडमिंटन संघटनेने परवानगीही दिलेली आहे. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची विनंती भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) मान्य
केली आहे.
सिंधू जानेवारीपासून थायलंडमध्ये 12 ते 17 व 19 ते 24 जानेवारी या कालावधीत होत असलेल्या दोन स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे. तसेच जागतिक स्पर्धेच्या 27 ते 31 जानेवारी या कालावधीत होत असलेल्या फेरीतही ती खेळणार आहे.
या स्पर्धामध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिताच सिंधूने प्रशिक्षक तसेच फिजिओची मागणी केली होती. सिंधू सध्या लंडन येथील राष्ट्रीय सराव केंद्रात सराव करत आहे.