सजावटीत मालिका, चित्रपटांची क्रेज कायम
आज वाई शहरासह ग्रामीण भागात बैलांची बेंदूर सणानिमित्त काढलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती. बैलांच्या सजावटीमध्ये मालिका, चित्रपटांची क्रेज दिसून आली. यामध्ये तुझ्यात जीव रंगला, राणादा, लागीर झालं जी, फौजी, झिंगाट, एक मराठा, लाख मराठा, असे वाक्य बैलांच्या अंगावर सुबक रंगानी रंगविलेली होती.
वाई – वाई शहरासह परिसरामध्ये शेतकऱ्यांनी बेंदूर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या संस्कृतीत बेंदूर सणाचे मोठे महत्व आहे. बैलांचे शेतकऱ्यांवर अनंत उपकार असतात व ते उपकार आपण फेडूही शकत नाही. म्हणूनही कृज्ञतता व्यक्त करण्यासाठी बेंदूर हा सण आत्मियतेने बळीराजा साजरा करतो. वास्तविक पाहता कष्ट करणा-या बैलांच्या सन्मानार्थ बेंदूर सणानिमित्त त्याची भक्तीभावाने स्नान घालून विधिवत पुजा केली जाते. बैलांना विविध प्रकारच्या रंगाने व सजावटीच्या साहित्य वापरून सजविले जातात. तसेच त्यांची गावातून त्यांची सवाद्य देवदर्शनासाठी भक्तीभावाने मिरवणूक काढतात, ही खरी प्रथा आहे.
वास्तविक पाहता बदलत्या यांत्रिकीकरणाच्या काळात बैलांची संख्या सर्वत्र दिवसेंदिवस कमी होत चालली आहे ही चिंतेची बाब आहे. वाई शहरासह ग्रामीण भागात बैलांच्या मिरवणूकीत बैल कमी व पारंपारिक वाद्याच्या तालावर नाचणारे सैराट कार्यकर्ते जास्त असे विदारक चित्र पहावयास मिळत होते. वाईच्या किसनवीर चौकात वाडीवस्तीवरून आलेल्या बैलांना पाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती. तसेच वाईच्या मुख्य चौकामध्ये फुगे, खेळणी, खाद्य पदार्थ व इतर विक्रेत्यांच्या दुकांनामुळे चौकाला यात्रेचे स्वरूप आले होते. शहरात पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.