पुणे : बिग बॅश लीगच्या 11व्या हंगामाचा अंतिम सामना पर्थ स्कॉचर्सने सिडनी सिक्सर्सविरुद्ध 79 धावांच्या फरकाने जिंकून जेतेपद पटकावले. पर्थने विजयासाठी दिलेले 172 धावांचे लक्ष्य सिडनी सिक्सर्स संघाला गाठता आले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 92 धावांत गारद झाला आणि पर्थ स्कॉचर्सने चौथ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला.
या निमित्ताने लेखातून बीबीएल-11 मध्ये मालिकावीराचा पुरस्कार पटकावणार्या बेन मॅकडरमॉटच्या कामगिरीवर नजर टाकणार आहोत.
1) मॅकडरमॉट ठरला मालिकावीर
अंतिम सामन्यानंतर होबार्ट हरिकेन्सकडून खेळणार्या 27 वर्षीय बेन मॅकडरमॉटला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. बेन ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज क्रेग मॅकडरमॉट यांचा मुलगा आहे. बेनने बीबीएलच्या 11व्या हंगामात 13 सामन्यांमध्ये 577 धावा केल्या. यामध्ये दोन शतकांचा समावेश होता.
2) बीबील-11 मध्ये सर्वाधिक षटकार
बेन मॅकडरमॉटने यंदाच्या बीबीएलमध्ये 48.08 च्या सरासरीने आणि 153.86 च्या स्ट्राइक रेटने 577 धावा केल्या आणि मोसमात खेळलेल्या 13 सामन्यांच्या 13 डावांमध्ये एकदा नाबाद राहिला. यादरम्यान त्याने 2 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली. 127 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याने या स्पर्धेत 46 चौकार आणि 29 षटकार मारले. सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर राहिला. त्याचबरोबर सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत तो ग्लेन मॅक्सवेलनंतर दुसर्या क्रमांकावर आहे. मॅक्सवेलने 49 चौकार मारले.
3) यशस्वी टी20 कारकिर्द
ऑस्ट्रेलियासाठी 2 एकदिवसीय आणि 17 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या बेन मॅकडरमॉटची टी-20 कारकीर्द चांगली आहे. त्याने 91 टी20 सामन्यांच्या 86 डावांमध्ये 32.90 च्या सरासरीने आणि 133.42 च्या स्ट्राइक रेटने 2303 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. बीबीएल-11 मधील त्याची कामगिरी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
4) आयपीएल लिलावात करोडोंचा पाऊस पडू शकतो
बेनच्या अलीकडच्या कामगिरीवर आयपीएलच्या सर्व 10 संघांची नजर असेल. त्यामुळे बेनवर करोडोंचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक संघात बेनसारख्या यष्टिरक्षक आणि धडाकेबाज सलामीवीराच्या शोधात असतो. त्याच्याकडे झटपट धावा करून संघाला चांगली सुरुवात करून देण्याची क्षमता आहे. त्यामुळे यंदाचा आयपीएल लिलाव बेनसाठी लॉटरी ठरु शकतो.
5) आयपीएलमध्ये अनसोल्ड
आयपीएल 2021 च्या लिलावात, 50 लाख रुपये मूळ किंमत असलेल्या बेन मॅकडरमॉटला कोणताही खरेदीदार सापडला नाही. यंदाच्या लिलावात नाव नोंदवताना मॅकडरमॉट म्हणाला, ’यावेळेस आयपीएल मेगा लिलावात मला कोणी करारबद्ध केले तर, मला वाटत नाही की मी कधी आयपीएल खेळू शकेन.