शिरूरच्या वाडा कॉलनीमधील घटना ः आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
शिरूर (प्रतिनिधी) – वाडा कॉलनी शिरूर येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असणाऱ्या तरुणाने प्रेयसीवर चारित्र्याचा संशय घेत चाकूने गळा कापून तिचा निर्घृण खून केला. ही घटना रविवारी (दि. 26) मध्यरात्री पावणेदोन वाजता घडली.
सारिका सुदाम गिरमकर (वय 30, रा. कुऱ्हाडवाडी, निमोणे, ता. शिरूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दत्तात्रय गेनभाऊ गायकवाड (वय 33, रा. वाडा वसाहत शिरूर; मूळ रा. शिंदोडी) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत वाडा कॉलनी येथील घरमालक बबन पर्वतराव शेटे यांनी फिर्याद दिली.
दत्तात्रय गायकवाड व सारिका गिरमकर हे दोघे वाडा कॉलनी येथे अनेक दिवसांपासून भाडेतत्त्वावर राहात होते. काही दिवसांपासून दत्तात्रय हा सारिका हिच्या चारित्र्याचा संशय घेऊ लागला, यावरून त्यांच्या दोघात अनेकवेळा भांडणेही झाली. चारित्र्याच्या संशयावरून दत्तात्रय याने झोपेतच सारिका हिचा चाकूने गळा कापून निर्घृण खून केला. त्यानंतर दत्तात्रय हा कारेगाव येथे कंपनीत कामाला निघून गेला. सोमवारी सकाळी शिरूर पोलीस ठाण्यात येत त्याने सारिकाचा खून केल्याची कबुली दिली आहे.
मेदनकरवाडीत एकाचा निर्घृण खून
चाकण – जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी मिळून तक्रार देणाऱ्या व्यक्तीचा कोयत्याने वार करत निर्घृणपणे खून केल्याची घटना रविवारी (दि. 26) मेदनकरवाडी (ता. खेड) येथे घडली. यापकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र जालिंदर काळे (वय 36, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर सत्यम दत्तात्रय कड (रा. कडाचीवाडी, ता. खेड) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.