पळसदेव (वार्ताहर) : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी एका बँक अधिकार्याचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या लोणी देवकर घडली. गणेश कडाकणे (वय 33, रा. इंदापूर) असे मारहाण करण्यात आलेल्या अधिकार्याचे नाव आहे.
या प्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक मनोज बाळासाहेब भोसले यांनी तक्रार दिली. फिर्यादीनुसार, सागर थोरात, निखिल थोरात, शुभम थोरात, सूरज थोरात, महेश थोरात आणि इतर चार अनोळखी आरोपींच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदाच्या लोणी देवकर येथील शाखेत गणेश कडाकणे हे सहायक शाखा अधिकारी म्हणून काम करतात.
शुक्रवारी (दि. 30) सागर थोरात त्यांच्या पत्नीसह बँकेच्या शाखेत दारू पिऊन आले होते. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्या पत्नीचं बँक खातं आधारशी लिंक करायचं होतं. त्यावरून त्यांचा बँकेचे शाखा अधिकारी, इतर कर्मचारी आणि गणेश कडाकणे यांच्याशी वाद झाला. त्यानंतर सागर थोरातने कडाकणे यांना धमकी देऊन बँकेतून बाहेर पडले.
बँक बंद झाल्यानंतर गणेश कडाकणे यांना सागर थोरात आणि त्यांच्या सहकार्यांनी बँक मॅनेजर आणि इतर एका व्यक्तीसमोर मारहाण केली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळसदेवच्या दिशेने घेऊन गेले. पुढे जाऊन पुन्हा कडाकणे यांना या सर्वांनी लोखंडी रॉड, पाइप आणि काठीने बेदम मारहाण केली. कडाकणे यांनी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेत पळ काढला.या घटनेने मात्र बँकिंग क्षेत्रात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर बँक अधिकारी संघटनेने याबाबत आक्रमक पवित्र घेतला आहे.
सध्या लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना याचे अनेक लाभार्थी बँकेत व्यवहार करण्यासाठी येत आहेत. ग्राहकांची संख्या अधिक असूनही अधिकाधिक तत्पर सेवा देतो. हा प्रकार घडल्याने दोषींवर कडक कारवाई व्हावी.
मनोज भोसले, शाखाधिकारी बँक ऑफ बडोदा पळसदेव