देशाची लाडकी सिमर परत येणार

'ससुराल सिमर का सीझन २' सुरू

सुमारे दहा वर्षांपूर्वी ‘ससुराल सिमर का’ या लोकप्रिय फॅमिली ड्रामाने सिमर आणि तिच्या कुटुंबाची हृदयस्पर्शी कथा सादर करून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. सर्वांना आवडतील अशा व्यक्तिरेखा मालिकेचा गाभा होत्या आणि त्या व्यक्तिरेखा घराघरांत नावाने ओळखल्या जात होत्या. सिमर आणि माताजी यांच्या व्यक्तिरेखा आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. प्रेक्षकांना तब्बल ७ वर्षे खिळवून ठेवत टेलीव्हिजनवर नवीन इतिहास घडवल्यानंतर आता कलर्सचा माइलस्टोन शो “ससुराल सिमर का’ दुसरा सीझन घेऊन येत आहे.

पूर्णपणे नवीन अवतारात ही मालिका आता एका नवीन सिमरची (छोटी) कहाणी दाखवणार आहे. ही भूमिका राधिका मुथुकुमार करत आहे. तिला गायिका व्हायचे आहे पण तिच्या आयुष्यात मोठी सिमर (दीपिका काकर) आणि गीतांजली देवी (जयती भाटिया) येतात आणि आयुष्याला अनपेक्षित कलाटणी मिळते. रश्मी शर्मा टेलीफिल्म्सची निर्मिती असलेल्या “ससुराल सिमर का २’ या मालिकेचा पहिला भाग सोमवार २६ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

एक साधी पण संवेदनशील अशी छोटी सिमर भावंडांमध्ये सर्वांत लहान आहे आणि तिच्या बहिणींच्या छायेतच लहानाची मोठी झाली आहे. मोठ्या सिमरप्रमाणेच ती तिच्या मूल्यांशी व तत्त्वांशी घट्ट जोडलेली आहे पण ती एक आधुनिक मुलगी आहे. ती महत्त्वाकांक्षी आहे आणि तिला संगीताच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवायचा आहे. दुसरीकडे गीतांजली देवी जुन्या विचारांच्या आहेत आणि त्यांचा नातू आरवसाठी (अविनाश मुखर्जी) महत्त्वाकांक्षी नसलेल्या, आपल्या स्वप्नांहून जास्त महत्त्व कुटुंबाला देणाऱ्या मुलीच्या शोधात आहेत. अनुकूल मुलगी शोधून काढण्याची जबाबदारी त्या बडी सिमरवर सोपवतात आणि हा शोध बडी सिमरला छोटी सिमरपर्यंत घेऊन येतो. छोटी सिमर आदर्श आहे पण गीतांजली देवींच्या अपेक्षांपेक्षा वेगळी आहे. त्यांची आयुष्ये परस्परांत विणली जातात आणि आदर्शांचा संघर्ष होतो, तसा छोटी सिमरचा, नवीन आयुष्य व नात्यांच्या शोधाचा, प्रवास सुरू होतो.

सिमरची भूमिका पुन्हा एकदा निभावण्याबद्दल दीपिका काकर म्हणाली, “सिमर ही व्यक्तिरेखा माझी खूप आवडती तर आहेच पण या व्यक्तिरेखेनेच मला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. या मालिकेशी व प्रेक्षकांशी माझे सहा वर्षांचे सुंदर नाते आहे आणि आता पुन्हा ही मालिका करताना मी रोमांचित झाले आहे. मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये सिमर एका नवीन अवतारात दिसेल. गीतांजली देवींच्या इच्छेनुसार आपली प्रतिकृती असेल अशी सून शोधण्याचे महत्त्वाचे काम तिला पूर्ण करायचे आहे आणि ही नवीन सीझनची पार्श्वभूमी आहे. प्रेक्षकांसाठी या मालिकेत अजून खूप काही आहे आणि या रोमांचक नवीन प्रवासासाठी मी उत्सुक आहे.”

नवीन सिमरच्या भूमिकेबद्दल राधिका मुथुकुमार म्हणाली, “प्रेक्षकांनी जिच्यावर खूप प्रेम केले आहे अशी प्रस्थापित व्यक्तिरेखा नव्याने करण्याची संधी फार क्वचित मिळते आणि सिमरची व्यक्तिरेशा अशीच आहे. नुसते नाव घेतले तरी नॉस्टॅल्जिया जागा होतो आणि आपल्याला आत्तापर्यंत बघितलेल्या अनेक उत्कृष्ट व्यक्तिरेखा व नाट्य आठवते. प्रेक्षक कायमच दीपिका काकरला सिमर म्हणून ओळखत आले आहेत आणि तिच्याकडून हा वारसा घेऊन छोटी सिमर साकारणे माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. ही साधी पण कणखर मुलगी आहे आणि गायिका होण्याचे स्वप्न जोपासत आहे. मी या नवीन प्रवासासाठी उत्सुक आहे आणि प्रेक्षक नवीन सिमरवरही प्रेमाचा वर्षाव करतील, अशी आशा मला वाटते.”

जयती भाटिया म्हणाली, “मला गेली अनेक वर्षे पहिल्या सीझनमधील माताजीच्या व्यक्तिरेखेवरूनच ओळखले जाते आणि आता दुसऱ्या सीझनमध्ये मी तिच्या बहिणीची गीतांजली देवीची व्यक्तिरेखा साकारत आहे. माताजीप्रमाणेच तीही कुटुंबातील प्रमुख व्यक्ती आहे आणि तिच्या नातवासाठी आदर्श मुलीच्या शोधात आहे. माझ्यासाठी तर हा पूर्णपणे अनोख्या क्षणांचा अनुभव आहे.”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.