मुंबई – ‘एक…दों…तीन…’ म्हणत सगळ्या बॉलिवूड कलाकारांना आपल्या तालावर नाचायला लावणार्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका ‘सरोज खान’ यांचं आज वयाच्या 71 व्या वर्षी मुंबईत निधन झालं. श्वासोच्छवासात त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. कार्डिअॅक अरेस्टमुळे आज पहाटे (3 जुलै) दोन वाजता सरोज खान यांनी अखेरचा श्वास घेतला.
सरोज खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी झाला. त्यांचे कुटुंब मूळचे पाकिस्तानचे. भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान ते आपल्या व्यवसायासह भारतात स्थायिक झाले. मूळ हिंदू असलेल्या सरोज यांनी इस्लाम स्वीकारला. सरोज यांचे खरे नाव ‘निर्मला किशनचंद संधू सिंग नागपाल’ लहानपासूनच सरोज यांना नृत्य आणि अभिनयात रस होता. मग काय, वयाच्या अवघ्या तिसर्या वर्षी त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. ‘नजराना’ चित्रपटात ‘श्यामा’ हे पात्र त्यांनी साकारले.
सरोज खान यांनी नृत्यदिग्दर्शक बी. सोहनलाल यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवले. बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात आलेल्या सरोज खान यांनी नृत्यक्षेत्राची पदवी प्राप्त करून नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1975 मध्ये गुलजार दिग्दर्शित ‘मौसम’ चित्रपटाद्वारे त्यांनी स्वतंत्रपणे नृत्य दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली. पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील ‘हवा हवाई’ गाण्यामुळे.
या चित्रपटानंतर त्यांच्याकडे अनेक चित्रपटांची रांग लागली. ’तेजाब’, ‘खलनायक’, ‘मिस्टर इंडिया’, ‘चालबाज’, ‘नगीना’, ‘चांदनी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘गुरु’ या चित्रपटांसह अलीकडच्या काळात आलेल्या ‘कलंक’, ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शिकेची भूमिका निभावली. सरोज खान यांनी श्रीदेवी, माधुरी दीक्षित, शाहरुख खान, काजोल, सलमान खान, ऐश्वर्या राय, सैफ अली खान, अक्षय कुमार, आमीर खान यांसह नव्या दमाच्या कलाकारांनासुद्धा त्यांनी नृत्य शिकवले आहे.
मात्र, माधुरी दीक्षित ही त्यांची सगळ्यात आवडती अभिनेत्री होती. तिचा डान्स त्यांना प्रचंड आवडायचा. त्यांनी सगळ्यात जास्त हिट गाणी माधुरीसोबतच दिली.