शिरूरमध्ये शिवसेनेची डरकाळी…

भाजपकडून स्वबळाचा नारा आणि मतदार


संघ फेरबदल निर्णयाचा परिणाम

– संतोष गव्हाणे

पुणे – भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना विधानसभा निवडणूक युती करून लढणार तसेच लोकसभेप्रमाणेच युतीचे घटक पक्षही महायुतीत असणार यासह मतदार संघाचे साटेलोटे होणार, अशा चर्चेचा धुरळा उडत असतानाच भाजपकडून स्वबळाचे नारे दिले जाऊ लागल्याने पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील राजकीय वारेही उलटे वाहू लागले आहे. यातूनच शिरूर-हवेली मतदारसंघात फेरबदलांचा धुरळा उडाला असून भाजपकडे असलेल्या या मतदारसंघात शिरकाव करण्यासाठी शिवसेनेनेही डरकाळी फोडली आहे.

लोकसभा निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीकरिता भाजपचा कॉन्फीडन्स वाढला आहे. यामुळेच 2014 मध्ये शिवसेनेशी युतीतून सत्ता स्थापन केल्यानंतरही गेली चार वर्षे टोचणारा भगवा धागा कायमचा काढून टाकण्याकरिता भाजप प्रयत्नशील आहे. 2014 मध्ये भाजपने स्वबळावर 123 जागा जिंकल्यानंतर 63 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेमुळे युतीच्या माध्यमातून भाजपला सत्ता सिंहासन सांभाळता आले; परंतु त्यानंतर “सत्तेतील विरोधक’ म्हणूनच शिवसेनेने कायम भाजपवर अंकुश ठेवला. याच कारणातून नाकापेक्षा जड होणारा मोती नको… म्हणून महाराष्ट्रातही एक हाती सत्ता आणण्याकरीता भाजपकडून युती पेक्षा स्वबळावरचे नारे दिले जाऊ लागले आहेत.

भाजपच्या या भूमिकेतूून राजकीय घडामोडीत महत्त्वाच्या ठरणाऱ्या शिरूर-हवेली मतदार संघातील वारे फिरले आहे. फेररचनेपूर्वी 1967 पासून कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात 1999 मध्ये राजकीय फेरबदल झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पोपटराव गावडे आमदार झाले, त्यानंतर 2004 मध्ये या मतदारसंघात भाजपने शिरकाव केला; बाबुराव पाचर्णे यांनी ही निवडणूक जिंकली. 2009 मध्ये ताकदीने उतरलेल्या राष्ट्रवादीने अशोक पवार यांच्या माध्यमातून या मतदार संघावर पुन्हा वर्चस्व मिळवले, तर 2014च्या मोदी लाटेत उतरलेले बाबुराव पाचर्णे यांनी पुन्हा भाजपची विजयश्री खेचून आणली. ही राजकीय आकडेमोड लक्षात घेता, या मतदार संघात गेली कित्येक दशके शिवसेनेची मोठी ताकद असताना (खासदार शिवसेनेचा) केवळ युतीच्या ओझ्याखाली असल्याने शिरूर मध्ये शिवसेनेचा आमदार होऊ शकला नाही. याच कारणातून 2019 मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी या मतदार संघावर शिवसेनेने दावा केला आहे. शिरूर ऐवजी शिवसेनेच्या ताब्यात असलेला भोसरी मतदारसंघ भाजपने घ्यावा, असा प्रस्ताव पुढे आला आहे. विशेष म्हणजे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविल्याने हे दोन्ही मतदार संघ युतीकरिता सोपे ठरणार असल्याचे मानले जात होते.

मात्र, भाजपला राज्यात एकहाती सत्ता हवी असल्याने राज्यातील 288 जागांवर भाजपचेच उमेदवार असल्याचे समजून कामाला लागावे, असे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तर, भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीही युतीबाबत चिंता करण्यापेक्षा सर्व मतदार संघात भाजपला ताकद देण्याची भूमिका ठेवण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. याच कारणातून युतीच्या मुद्यावर गाफील राहण्यापेक्षा शिवसेनेकडूनही हक्काच्या मतदार संघात डरकाळ्या फोडल्या जात आहेत. यामध्ये जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या असलेल्या शिरूर-हवेली मतदारसंघातूनही स्वबळाचा आवाज येवू लागला आहे. युती झालीच तर भोसरी-शिरूरचे साटेलोटे आणि नाही झाली तरी येथे आव्हान देण्याचा मनसुबा शिवसेनेने आखला आहे.

राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना लढत…
शिरूर विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या अधिपत्याखालील समजला जातो. माजी आमदार पोपटराव गावडे, अशोक पवार, प्रदीप कंद या सारख्या मातब्बरांनी राष्ट्रवादी भक्कम केली. तर, शिवसेनेच्या मदतीने भाजपचे वर्चस्व वाढविण्यास आमदार बाबुराव पाचर्णे यांनी प्रयत्न केले. पहिल्या फळीतील या नेत्यांची शिरूर मतदार संघावर पकड असताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून या मतदार संघात शिवसैनिकांनी शिवसेना वाढविली आणि रुजविली. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर (माऊली) कटके यांचे नाव घेतले जाते. यामुळेच शिरूर मध्ये होणाऱ्या विधानसभेसाठी अन्य पक्षांसह शिवसेनेकडून ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत. भाजप-शिवसेना युतीतील फेरबदल किंवा स्वबळावर निवडणुका लढविल्या गेल्या तर शिरूर-हवेलीत राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशीच तिरंगी लढत पक्की ठरली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)