ब्रुसेल्स -आयसीसीचे सहयोगी देश असलेल्या बेल्जियम व ऑस्ट्रिया यांच्यातील सामन्यात एक अनोखा विक्रम साकार झाला. बेल्जियमची एक वेळ 8 बाद 14 अशी दयनीय स्थिती झालेली असताना नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या साबर जाखिलने वादळी शतक फटकावले. संघाची स्थिती बिकट असताना साबरने केलेली कामगिरी एक विक्रमच ठरली.
नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या साबरने 47 चेंडूत नाबाद शतकी खेळी करत बेल्जियमला विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने 5 चौकार आणि तब्बल 8 षटकार अशी आतषबाजी केली. एक वेळ बेल्जियमच्या संघाने 14 धावात 8 गडी गमावले होते. पण नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या साबरने शतक फटकावताना संघाला 146 धावांचे लक्ष्य गाठून दिले. पावसामुळे ऑस्ट्रिया संघाला 6.1 षटकात 50 धावांची गरज होती. पण ऑस्ट्रियाला 37 धावांवर रोखत बेल्जियमने विजय साकार केला.
आठव्या किंवा त्यापेक्षाही तळात फलंदाजी करताना शतक फटकावणारा साबर टी-20 क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम श्रीलंकेच्या इसुरू उदानाच्या नावावर होता.
2019 साली त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती. काही दिवसांपूर्वी आयर्लंडच्या सिम्मी सिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन नाबाद शतक फटकावले होते. एकदिवसीय सामन्यात आठव्या क्रमांकावर खेळताना शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला.