डोंगराकडेचे शेवटचे गाव म्हणून पुणे पालिकेचे अधिकारी फिरकलेच नाहीत

फुरसुंगी – महापालिकेत समावेश झालेल्या उरूळीदेवाची परिसरातील डोंगराकडेचे शेवटचे गाव असल्याने पालिकेचे अधिकारी सर्वेक्षणासाठी फिरकलेच नाहीत यामुळे पिंजणवस्ती येथे गेल्या चार वर्षांत पालिकेने एकही पाणी टॅंकर पाठविला नाही.
कानिफनाथ डोंगर परिसर आणि बंधाऱ्याकडेला असलेल्या पिंजणवस्तीमध्ये गेल्या चार वर्षांत पालिकेचा पाण्याचा एकही टॅंकर गेला नाही. बंधाऱ्याकडेला असल्याने येथील विहिरींना पाझरामुळे पाणी येते, त्यामुळे इतकी वर्षे पाण्याची कमतरता जाणवत नव्हती. मात्र, पालिकेतील समावेशामुळे गावाला काहीसे उपनगराचे स्वरूप आले असून या भागाचे नागरिकरण झाल्याने पाण्याची मागणी वाढली आहे.
या भागाचे निसर्गरम्य वातावरणामुळे येथे नव्याने येणाऱ्या नागरिकांनी संख्या वाढती आहे. याच कारणातून पूर्वी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी कमी पडत आहे. पालिकेत समावेश झाल्यानंतर पालिकेकडून पाणी मिळेल, अशी या गावांतील नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या भागात कधी सर्व्हेच केला नाही, त्यामुळे पालिकेत असूनही पिंजणवस्ती पाण्यापासून वंचीत राहिली. आता, पालिकेतून बाहेर पडून या गावाचा समावेश नव्या नगरपरिषदेत होणार आहे.
माझी या भागात नव्याने नियुक्ती झालेली आहे. उरूळी देवाची परिसरातील पिंजणवस्तीसह संपूर्ण भागाची पाहणी करून येथील नागरिकांना त्वरीत पिण्याचे पाणी टॅंकरने उपलब्ध करून दिले जाईल.
– निखिल घरत, कनिष्ठ अभियंता, हडपसर क्षेत्रीय कार्यालय





