नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21च्या छपाई प्रक्रियेला हलवा कार्यक्रमाने आज सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत दिल्लीत नॉर्थ ब्लॉकमध्ये पार पडला. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर, वित्त सचिव राजीव कुमार यांच्यासह वित्तमंत्रालयाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 संसदेत मांडण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पाची नॉर्थ ब्लॉकमधे छपाई होते. अर्थसंकल्पाची गोपनीयता राखण्यासाठी, अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेतले अधिकारी या काळात इथेच राहतात.
तसेच याच्याशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी आता वित्तमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच आपल्या आप्तांशी संपर्क साधू शकतील. दरम्यान, या कार्यक्रमानंतर अर्थमंत्र्यांनी छापखान्याचा फेरफटका मारुन अर्थसंकल्पाच्या छपाई प्रक्रियेबाबत जाणून घेतले.