पुणे, [प्रभात वृत्तसेवा} – दिगंबर जैन समाजाचे भाद्रपद दशलक्षण पर्युषण महापर्व रविवार (८ सप्टेंबर) पासून सुरू झाले आहे. शहरातील जैन मंदिरात वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याची समाप्ती पालखीच्या मिरवणुकीने १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
यानिमित्ताने मॉडेल कॉलनीतील एच. एन. डी. जैन बोर्डिंगमधील मंदिरात संस्थेचे विश्वस्त चकोर गांधी आणि अधीक्षक सुरेंद्र गांधी यांनी पर्वकाळात सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे.
या पर्वात उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, अकिंचन्य आणि उत्तम ब्रह्मचर्य या दशलक्षणांची पूजा करण्यात येते. जैन समाजात या पर्वाला अत्यंत महत्त्व असून, पर्वकाळात उपवास, स्वाध्याय, तप, त्याग आदी उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतात.
दशलक्षण महापर्व केवळ जैन समाज किंवा त्यातील विशिष्ट पंथांसाठीच नव्हे, तर तो प्रत्येक मानवाचा आत्मधर्म आहे, असे शास्त्रात नमूद केले आहे.