तुरुंगात टाकण्याची पालकमंत्र्यांकडून धमकी 

वसंतराव मानकुमरेंचा गंभीर आरोप; सदस्यांकडून प्रशासनावर जोरदार टीका
तुरुंगात टाकण्याची पालकमंत्र्यांकडून धमकी

सातारा  –“बेकायदेशीर खाणीवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांनी फेकून दिले. एवढेच नव्हे तर खंडणीचा गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठविण्याची धमकी पालकमंत्र्यांनी दिली,’ असा गंभीर आरोप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केला. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी छ. शिवाजी महाराज सभागृहात करण्यात झाली. मानकुमरे, पवार, गोरे यांच्यासह सदस्यांनी प्रशासनाच्या कारभारावर सडकून टीका केली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगौड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.

जावळी तालुक्‍यात केंजळ गावाच्या परिसरात खाणीच्या माध्यमातून उत्खनन होत आहे. महसूल विभागाने खाणीला मंजूरी देताना इतर 19 अटींची पूर्तता केली नाही. रस्त्यापासून काही अंतरावरच उत्खनन होत असल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्याचबरोबर खनिज वाहतुकीसाठी रस्त्यावरून डंपरची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे रस्त्याची पूर्णत: वाट लागली असल्याचा मुद्दा दीपक पवार यांनी उपस्थित केला. त्यावर “याबाबत पालकमंत्र्यांकडे निवेदन देण्यास गेलो असता त्यांनी निवेदन अंगावर फेकून दिले व खंडणीचा गुन्हा दाखल करून तुरूंगात पाठविण्याची धमकी दिली,’ असा आरोप मानकुमरे यांनी करताच सभागृहात काही क्षण स्मशान शांतता पसरली.

त्यानंतर दीपक पवार आक्रमक होत, “गावचा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने खाण बंद केली पाहिजे,’ अशी मागणी केली. मात्र, खाण आपल्या हद्दीत येत नसल्यामुळे कारवाई करता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर पवार संतप्त झाले. खाणमालकाच्या विरोधात तक्रार दाखल करा, अशी मागणी सदस्यांनी पवारांकडे केली. त्यावर पवार म्हणाले, “तक्रार पण आम्हीच दाखल करायची का? ते काम प्रशासनाचे आहे.’ अखेर अध्यक्ष निंबाळकर यांनी हस्तक्षेप करत खाणीवर कारवाई करण्याच्या मागणीचा ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवू, असे सुचविले. सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा देत ठराव मंजूर करण्यात आला.

“महालॅब’वर कारवाईसाठी सचिवांना पत्र

ग्रामीण रूग्णालय व आरोग्य केंद्रात बोगस रूग्णांची कागदपत्रे जोडून कंत्राटदार महालॅबच्या लाखो रूपयांचा भ्रष्टाचार करीत आहे, अशी तक्रार सुरेंद्र गुदगे यांनी मागील सभेत केली होती. त्याबाबत काय कारवाई आली, अशी विचारणा गुदगे यांनी केली. त्यावर संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “गुदगे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तथ्य आढळले आहे. त्याबाबत आरोग्य विभागाचे सचिव प्रदीपकुमार व्यास यांना पत्र पाठविले आहे. त्यांच्याकडून अद्याप उत्तर मिळालेले नाही. मात्र, आता पुन्हा एकदा पत्रव्यवहार करून “महालॅब’चे कंत्राट रद्द करण्याची मागणी करण्यात येईल, असे संजीवराजे यांनी सांगितले.

सभापतींना कुत्रे चावले, मात्र इंजेक्‍शन उपलब्ध नाही!

माण पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे यांना कुत्रे चावल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात इंजेक्‍शन उपलब्ध झाले नाही, यावरून आरोग्य विभागाच्या कारभारावर अरूण गोरे यांनी टीका केली. ते म्हणाले, “माण पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे यांना कुत्रे चावले. मात्र, त्यांना मोजकीचे इंजेक्‍शन उपलब्ध झाली. उर्वरित इंजेक्‍शन घेण्यासाठी शेजारील गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत जाण्याचा सल्ला तेथील डॉक्‍टरांनी दिला.’ सभापतींवरच अशी वेळ येत असेल तर आरोग्य विभागाचा कारभार कसा आहे ते पाहा, अशा शब्दात गोरे यांनी टीका केली. त्यावर अध्यक्ष निंबाळकर यांनी रमेश पाटोळे यांच्याकडे विचारणा केली.

गोरे यांनी सांगितलेली हकीकत खरी असून तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पाटोळे यांनी केली. मार्डीत आमदार जयकुमार गोरे यांचे स्वीय सहाय्यक तसेच जिल्हा परिषद सदस्य सोनाली पोळ यांना डेंग्यू झाला. अशा स्थितीत तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसे वैद्यकीय अधिकारी नाहीत, अशी तक्रार गोरे यांनी केली. त्यावर तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबरोबर आरोग्य केंद्रात एखादे इंजेक्‍शन उपलब्ध नसेल तर शेजारील गावच्या आरोग्य केंद्रातून मागवून घ्या, अशा सूचना संजीवराजे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.