आधी रुग्ण गायब; नंतर केले मृत घोषित

  • हलगर्जीपणाचा कळस; बेजबाबदार ठेकेदारांना पोसणे आयुक्त बंद करणार का?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड सेंटरमधील बेजबाबदार आणि निष्काळजीपणाची अनेक उदाहरणे समोर येत असताना आज त्याचा कळस झाला. सहा दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल करण्यात आलेली करोना बाधित वृद्ध महिला अचानक गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला. सोमवारी सायंकाळपर्यंत रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या नातेवाईकांची फरफट करत रुग्णाबाबत कोणतीच माहिती दिली नाही. रात्री उशीरा मात्र सदरचा रुग्ण मयत झाल्याचे घोषित करण्यात आले. या प्रकारामुळे हादरलेले नातेवाईक सैरभैर झालेले असून जम्बो कोविडमध्ये रुग्णांबाबत नेमके काय सुरू आहे? असा प्रश्न या प्रकारामुळे निर्माण झाला आहे.

रुग्णालयाच्या या भोंगळ कारभाराची महापालिका आयुक्त गांभिर्याने दखल घेणार का? असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला असून राजकीय वरदहस्ताने ठेकेदारी मिळविलेल्या जम्बो कोविड चालकाला अभय दिले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लक्ष्मी हरी गाडगीळ (वय 72, रा. डोंबिवली) असे पहिल्यांदा बेपत्ता झालेल्या आणि नंतर मयत घोषित केलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. गाडगीळ दांपत्याला एकुलती एक मुलगी असून त्या रावेत येथे राहण्यास आहेत. काही दिवसांपूर्वी गाडगीळ दांपत्याला त्रास होऊ लागल्याने ते मुलीकडे रावेत येथे आले होते. हरी गाडगीळ यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर लक्ष्मी गाडगीळ यांना करोनाची लागण झाल्याने त्यांना नेहरूनगर, पिंपरी येथील जम्बो कोविड रुग्णालयात 14 एप्रिल रोजी दाखल केले.

सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गाडगीळ यांचे जावई भावे यांना जम्बो कोविड सेंटरमधून (मोबा. 8421447767) फोन आला की तुमचा रुग्ण बेपत्ता आहे. यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत रुग्णालयाच्या प्रशासनाकडे विचारणा केली असता रुग्णाचे आधारकाडे आणि पॅनकार्ड व्हाटस् अ‍ॅपवर (क्रमांक 9623586793) पाठविण्यास सांगितले.

नातेवाईकांनी तात्काळ आधारकार्ड व पॅनकार्ड सांगितलेल्या क्रमांकावर पाठविले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने तुमच्या रुग्णाला डिस्चार्ज दिल्याचे सांगितले. आमच्या रुग्णाचे कोणीच नातेवाईक शहरात नसल्याचे भावे यांनी सांगितले. यानंतरही मुजोरी करत रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी तुमचा रुग्ण तुम्ही शोधा म्हणत धमकाविण्याचा प्रयत्न केला. यानंतरही नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे आपणच चौकशी करा, अशी विनंती सुरूच ठेवली.

त्यानंतर काही वेळात रुग्णालय प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नाव साधर्म्यामुळे गल्लत झाली. तुमचा रुग्ण उपचार घेत असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे नातेवाईकांना सांगितले. मात्र आमचा रुग्ण आम्हाला दाखवा, असा आग्रह नातेवाईकांनी धरला असता आम्हाला तसे करता येणार नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. किमान व्हिडीओ कॉल करून अथवा उपचार सुरू असल्याचा फोटो तरी दाखवा अशी आर्जव नातेवाईकांनी केली मात्र दुपारी दीड वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत नातेवाईकांना रुग्ण सुरक्षित असल्याचा कोणताही पुरावा रुग्णालयाने दिला नाही. यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास तुमचा रुग्ण मयत झाल्याचा निरोप रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात आला. या संपूर्ण प्रकाराबाबत नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्न निर्माण झाला असून रुग्ण खरेच मयत झाला, गायब झाला की या प्रकारामागे आणखी काय? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आयुक्त दखल घेतील का?
जम्बो कोविड रुग्णालय सुरू झाल्यापासून या रुग्णालयाबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी शेकडो तक्रारी महापालिकेकडे केल्या आहेत. मात्र आतापर्यंत याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीच दखल न घेता या ठेकेदाराला मोकळे रान सोडले आहे. हा ठेकेदार राज्य पातळीवरील एका राजकीय वरदहस्ताने मनमानी करत असल्याचेही सांगण्यात येत आहे. अत्यंत बेजबाबदार कारभार करणार्‍या ठेकेदारावर महापालिका आयुक्त आतातरी कारवाई करतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुरावा देण्यास नकार
याबाबत कोविड रुग्णालयाच्या प्रशासकीय प्रमुख प्रिती व्हिक्टर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लक्ष्मी नावाचे दोन रुग्ण असून नाव साधर्म्यामुळे हा गोंधळ झाला आहे. रुग्णाला व्हिडीओ कॉल करून का दाखवित नसल्याबाबत विचारले असता त्यावर मात्र त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.