Aus A vs Ind A (2nd unofficial Test) : भारतीय संघ 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळणार आहे. ही ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच या मालिकेचा भाग असलेले टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू वाईटरित्या फ्लॉप झाल्याचे दिसून आले. या फ्लॉप खेळाडूंनी टीम इंडियाची चिंता वाढवली. एक खेळाडू खातेही न उघडता बाद झाला.
वास्तविक, सध्या भारत-अ आणि ऑस्ट्रेलिया-अ यांच्यात दुसरा चार दिवसीय प्रथम श्रेणी सामना खेळला जात आहे. या दुसऱ्या सामन्यात बीसीसीआयने केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि प्रसिध कृष्णा यांचा भारत-अ संघामध्ये समावेश केला आहे. हे तिन्ही खेळाडू बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचाही भाग आहेत. पण केएल राहुल आणि अभिमन्यू ईश्वरनच्या खराब फॉर्मने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. या सामन्यात भारत-अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि अभिमन्यू ईश्वरन सलामीला दिसले. इसवरन धावा न करता शून्यावरच पॅव्हेलियनमध्ये परतला, तर केएल राहुलला एक चौकार मारून केवळ 04 धावा करता आल्या.
रोहितच्या जागी अभिमन्यू ईश्वरनला दिली जाणार संधी..
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनकडे टीम इंडियामध्ये रोहित शर्माच्या जागी पाहिले जात आहे. वृत्तानुसार, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा अनुपलब्ध राहू शकतो. भारतीय कर्णधाराच्या अनुपस्थितीत सलामीवीर म्हणून अभिमन्यू ईश्वरनकडे पाहिले जात असले तरी त्याचा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे.
सलग चार शतके झळकावून अभिमन्यू आला होता चर्चेत…
अभिमन्यू ईश्वरन अलीकडे खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये सलग चार शतके झळकावून चर्चेत आला होता, त्यानंतर त्याला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले. त्याआधी त्याला भारतासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवण्यात आले, जिथे तो आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे. ऑस्ट्रेलिया-अ विरुद्धच्या पहिल्या सामन्यात अभिमन्यूने 07 आणि 12 धावा केल्या होत्या.