तातडीने 13 सप्टेंबरला बोलावली स्थायी समितीची बैठक
पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या बहुचर्चित “एचसीएमटीआर’ मार्गिकेचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीपूर्वीच होण्याची चिन्हे आहेत. या मार्गिकेसाठी मागविण्यात आलेल्या निविदा मंजूर करण्यासाठी प्रशासनाबरोबरच सत्ताधारीही प्रयत्नशील असून, यासाठी 13 तारखेला तातडीने स्थायी समितीची बैठक बोलविली आहे.
शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यामध्ये हा मार्ग सुचवण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे केवळ या मार्गावर चर्चा होत राहिली आहे. मात्र, राज्य सरकारने या मार्गाला प्रत्यक्षात गती दिली आहे. यासाठी काही महिन्यांपूर्वी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. या निविदा आंतरराष्ट्रीय स्तरावरून मागवण्यात आल्या असून सिंगापूर, चीन आणि भारतातील एका बड्या उद्योगसमूहानेही निविदा भरली आहे. या निविदा चढ्या दराने आल्या आहेत. त्यामुळे निविदा उघडून 2 आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही प्रशासनाकडून सातत्याने तांत्रिक तपासणीच्या नावाखाली या निविदांना मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव तयार केला नव्हता, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
चढ्यादराने आलेल्या निविदा मंजूर करू नयेत, पुणेकरांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनीही आयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे. विधानसभा निवडणूक आचारंसहिता सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पाचे किमान भूमिपूजन करून त्याचे क्रेडीट घेण्यासाठी सत्ताधारी भाजप प्रयत्नशील आहे.