बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरने 25 फेब्रुवारी रोजी आपला 40वा वाढदिवस साजरा केला. दिल्लीत जन्मलेल्या शाहिद कपूरने दिर्घ काळ स्ट्रगल केल्यानंतर चित्रपटसृष्टीत आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करण्यापूर्वी शाहिदने अनेक चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलेले आहे.
ऐश्वर्या रायच्या सुपरहिट ठरलेल्या “ताल’ आणि करिश्मा कपूरच्या “दिल तो पागल है’ यासारख्या चित्रपटांमध्येही तो बॅकग्राउंड डान्सर म्हणून झळकला होता. तसेच सुरुवातीच्या काळात शाहीद कपूरने पेप्सीच्या जाहीरातीमध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोलसह काम केलेले आहे.
“इश्क विश्क’ या चित्रपटतून शाहिदने बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. विशेषत: चित्रपटातील शाहिदचा रोमांटिक अंदाज चाहत्यांना खूपच भावला. या चित्रपटासाठी शाहिदला “बेस्ट मेल डेब्यू’ या फिल्म फेयर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. यानंतर त्याने अनेक हिट चित्रपट देत चाहत्यांची मने जिंकली.
2006मध्ये प्रदर्शित झालेला “विवाह’ चित्रपटामुळे शाहिदला खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर 2007मध्ये प्रदर्शित झालेल्या “जब वी मेट’ चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर धम्माल केली. तसेच 2009मध्ये विशाल भारद्वाजच्या “कमीने’ चित्रपटातील शाहिदच्या अभिनयाचेही खूप कौतुक करण्यात आले.
दरम्यान, शाहिद कपूरने आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या मीरा राजपूतशी 2015मध्ये विवाह केला. या दोघांना मीशा आणि जैन अशी दोन मुले आहेत.