विखे यांच्या झंझावातापुढे अकोले वगळता साऱ्यांचाच पाचोळा

प्रा. डी. के. वैद्य /अकोले: लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता शिर्डी लोकसभा मतदारसंघात विखे यांच्या झंझावातापुढे साऱ्यांचाच पाला पालापाचोळा झाल्याचे चित्र निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे. अकोल्याचा गड शाबूत राखण्यामध्ये पिचड पिता-पुत्रांना यश आले. हा अपवाद वगळता संगमनेर, राहता, कोपरगाव, नेवासे, श्रीरामपूर या सर्वच विधानसभा मतदारसंघांत विखे यांचा झंझावात सर्वांना नेस्तनाबूत करून गेला, हे मान्यच करायला हवे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मोदी लाटे’चा प्रभाव देशभर होता. या मोदी लाटेचे “त्सुनामी’त रूपांतर करीत विखे यांनी या मोदी लाटेला पूरक भूमिका बजावली. आणि एकेकाळी कॉंग्रेसचा असणार हा बालेकिल्ला आज भगवामय झाला असल्याचे अधोरेखित झाले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांत “शिवसेना’ “शिवसेना’ आणि “शिवसेना’ अशी विजयाची हॅट्ट्रिक झाली आहे. 2009 साली शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये आघाडीच्या रामदास आठवले यांना पराभूत केले. वाकचौरे यांनी 2014 साली पक्ष बदलून कॉंग्रेसची उमेदवारी स्वीकारली. तेंव्हा शिवसेनेचे उमेदवार म्हणून सदाशिव लोखंडे त्यांच्या पुढे उभे राहिले. सतरा दिवसांच्या प्रचाराने माजी खासदार वाकचौरे यांना लोखंडे यांनी पराभूत केले.

2019 च्या निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केलेल्या व साडेचार वर्षे कुठेही न फिरणाऱ्या खा. लोखंडे यांचा निश्‍चित पराभव होणार, अशी परिस्थिती होती. पण दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातील जागेच्या तिढ्याने सारेच प्रश्न निकाली काढले. त्यांनी या दोन्ही मतदारसंघात आपला वरचष्मा असल्याचे निश्‍चितपणे दाखवून दिले.

डॉ. सुजय यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून आपली उमेदवारी पक्की केली. गेले तीन वर्षे मतदार संघाची केलेली पाहणी त्यांना कामाला आली. त्यांच्या मदतीला आई शालिनीताई व पिता माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील होते. नगर दक्षिणचे मतदान झाल्यानंतर 23 एप्रिलला त्यांनी आपल्या प्रचाराचा लवाजमा उत्तरेकडे हलविला. उरलेल्या सहा दिवसांमध्ये विखेंचा झंजावात सर्व दिशांनी अक्षरशः आपले अस्तित्व दाखवून गेला.
अकोले विधानसभा मतदारसंघांमध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांना 49 हजार 514 मते मिळाली, तर आ. भाऊसाहेब कांबळे यांना 81 हजार 165 मते मिळाली. यामध्ये आ. वैभवराव पिचड व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी परिश्रम घेत व आघाडीच्या धर्माला जागत आ. कांबळे यांना 31 हजार 651 मतांची आघाडी मिळवून दिली. येथे मात्र “न मोदी लाट चालली, ना विखे फॅक्‍टर आपला प्रभाव पाडू शकला.’ त्यामुळे पिचड पितापुत्रांचा अकोले हा गड शाबूत राहिला, हे यानिमित्ताने दिसून आले.

या उलट चित्र संगमनेर विधानसभा मतदारसंघात राहिले. राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे यांच्या नाकावर टिच्चून आ. कांबळे यांची उमेदवारी मागून घेतली. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीची सभा शेवटच्या क्षणी संगमनेरला घेऊन आपल्या उमेदवाराचा विजय निश्‍चित करण्याच्या दृष्टीने धोरण आखले. त्यात ते यशस्वी झाले. पण तरीही थोरातांना विखे यांच्या प्रभावाला सामना करता आला नाही. या मतदारसंघात खासदार लोखंडे यांना 6625 मतांची आघाडी मिळवून देण्यात विखे यशस्वी झाले. आपण यापुढे यापेक्षाही अधिक उपद्रव मूल्य राजकीय क्षेत्रात दाखवून देऊ. या निमित्ताने प्रकर्षाने त्यांनी स्पष्ट केले.

राहता विधानसभा मतदारसंघांमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक छत्री धनुष्यबाण चालवला. आणि त्यांना विरोधक म्हणून कोणीही पुढे आले नाही. तुल्यबळ विरोधकांअभावी याठिकाणी खासदार लोखंडे यांना 62 हजार 186 आघाडी विखे यांनी मिळवून दिली आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची आपली “व्होट बॅंक’ गेल्या निवडणुकीत कायम टिकून आहे, हेही दाखवून दिले. तसेच खा. लोखंडे यांच्या विजयाचा मार्ग प्रशस्त बनवला.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये “काळे विरुद्ध कोल्हे’ हा पारंपरिक संघर्ष कायम राहिला. कोल्हे कुटुंबीय यांनी भगवा हाती धारणा केला असल्याने त्यांना कोपरगाव शहराचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची मदत झाली. आणि या तुल्यबळ लढतीमध्ये कांबळे यांना आघाडी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या आशुतोष काळे यांना मात्र यश आले नाही. विखे यांनी त्यांनाही आपल्या जोरदार प्रचार टिकू दिले नाही. या मतदारसंघात खासदार लोखंडे यांना एकूण 39 हजार 299 मतांची आघाडी मिळवून दिली.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ म्हणजे आमदार कांबळे यांचे “होम ग्राउंड’ होते. या होम ग्राउंडवर त्यांना मोठे मताधिक्‍य मिळेल, अशा आशा होती. पण आ. कांबळे यांना आदिक व मुरकुटे गटाने मताधिक्‍य मिळवण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न विखे यांच्या झंझावातापुढे टिकले नाहीत. त्यांच्याबरोबर ससाने गट राहिल्याने या मतदारसंघात खासदार लोखंडे यांना 21 हजार 458 मतांची आघाडी मिळाली. आणि विजयाचे समीकरण अधिकाधिक उंचावत गेले व “होम ग्राऊंड’वर कांबळे यांचे नाणे वाजले नाही हे दुर्लक्षून चालणार नाही.

नेवासे विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना गडाख कुटुंबीयांच्या किंवा त्यांच्या समर्थकांच्या प्रतिकाराला चिवट झुंज द्यावी लागली. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्यांचे समर्थक, आघाडीचे बिनीचे शिलेदार यांनी शर्थीचे प्रयत्न केले. खा. लोखंडे यांचे आ. मुरकुटे यांच्यामुळे मताधिक्‍य 19 हजार 734 पर्यंत पोहोचले. पण श्रीरामपूर, कोपरगाव, राहता यांच्याशी तुलना करता ही आघाडी कमीच वाटते.

या निवडणुकीच्या लढतीमध्ये सदाशिव लोखंडे यांना 4 लाख 83 हजार 449 मते मिळाली, तर भाऊसाहेब कांबळे यांना 3 लाख 64 हजार 113 मतांची बेगमी गोळा करता आली. पण शेवटी खासदार लोखंडे एक लाख 19 हजार 336 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. आणि “कामाचा’ (बिगर कामाचा) हा लोकप्रतिनिधी पुन्हा संसदेत निवडून गेला. अशा प्रकारचे केवळ आणि केवळ विखे झंझावातामुळे घडू शकले, अशी आता लोकांची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

आगामी काळात माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात प्रवेश करणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. पाच-सहा महिन्यांच्या उर्वरित काळामध्ये त्यांना मंत्रिपदाची संधीही मिळणार आहे. आणि या मंत्रिपदाच्या काळामध्ये ते नगर जिल्ह्याचे राजकारण पुत्राला व युतीच्या कार्यकर्त्यांना जोडीला घेऊन ढवळून काढतील हे सांगण्याला ज्योतिषाची गरज भासणार नाही. एवढेच नव्हे शिर्डी आणि दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघांमध्ये आपली मजबूत फळी उभी करून आगामी निवडणुकीची गणिते ते मांडण्याला सुरुवात करतील हे निश्‍चित आहे.

या परिस्थितीमुळे ते आपले सर्व लक्ष बाळासाहेब थोरात व पिचड पिता-पुत्र यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करतील. जिल्हा परिषद निवडणूक नंतर होणार असली, तरीही विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे अध्यक्ष पद पक्षीय समीकरणामुळे बदलून ते पद घरातच ठेवण्याला ते प्राधान्य देतील. शिवाय जिल्हा सहकारी बॅंक आपल्या कवेत घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न त्या रोखाने सुरू राहतील. शिवाय दक्षिणेमध्ये पालकमंत्री प्रा. राम शिंदे किंवा श्रीगोंद्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते, पारनेरमध्ये विद्यमान विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, नगर शहरामध्ये माजी खासदार दिलीप गांधी यांना बळ देऊन युतीची भक्कम मोट बांधण्यासाठी ते प्रयत्न करतील. त्यामध्ये शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे आणि त्यांच्याकडे पाठ करून बाहेर गेलेल्या हर्षदा काकडे यांना शेवगावमधून कशा प्रकारचा ते आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात, हे पाहणे औत्सुक्‍य निर्माण करणारी बाब ठरणार आहे.

आता निवडणुका संपल्या आहेत. आणि पाणीटंचाईला अतिशय भीषण असे स्वरूप प्राप्त झाले आहे. याकडे हे सर्व लोकप्रतिनिधी लक्ष देणार काय? आणि यासाठी विखे पिता-पुत्र या सर्वांना पुढे घेऊन यातून जनतेला दिलासा देणार काय? हे पाहणेही औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×