नगर – भारतीय पोस्ट खात्याचा नगर विभाग तब्बल 40 वर्षांपासून एक हजार स्क्वेअर फुटाची जागा व ती ही शहराच्या मध्यवस्तीत वापरत आहे. गांधी मैदानातील आनंदीबाजार सबपोस्ट शाखा वापरत असलेली जागा जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची आहे. 1983 पासून बॅंकेशी कोणताही करार न करता पोस्ट खाते ही जागा वापरत आहे. त्यामुळे, पोस्टाने ही जागा खाली करून बॅंकेला परत द्यावी, या मागणीसाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे अध्यक्ष संदीप मोटे, उपाध्यक्ष कैलास सारोक्ते, ज्येष्ठ नेते बापूसाहेब तांबे, राजेंद्र निमसे व बॅंकेच्या संचालक मंडळाने गुरुवारी पोस्टासमोर धरणे आंदोलन केले.
येत्या दोन महिन्यात जागा खाली करण्याची ग्वाही पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी दिली. नगरच्या गांधी मैदानात जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची ऐक्य मंदिर इमारत आहे. 1967 मध्ये बांधलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर आनंदीबाजार सबपोस्ट ऑफिस आहे. मासिक 360 रुपये भाड्याने 16 वर्षे पोस्टाने भाडे दिले. 1983 मध्ये कराराची मुदत संपल्यावर त्याचे नूतनीकरणही केले नाही व तेव्हापासून आतापर्यंतच्या 40 वर्षात एक रुपयाही भाडे बॅंकेला दिले नाही. जनसेवा म्हणून बॅंकेनेही त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही.
सहकार क्षेत्रातील बॅंकेला व्यावसायिक भाडे आकारणीला रिझर्व्ह बॅंकेची परवानगी नाही तसेच बॅंकेचे सभासद असलेल्या निवृत्त शिक्षकांना मुख्य कार्यालयातील कामासाठी तब्बल तीन मजले पायऱ्या चढाव्या लागत असल्याने त्यांच्यासाठी खाली तळमजल्यावर बॅंकेच्या मालकीच्या सबपोस्टाच्या जागेत बॅंकेचा सेवा कक्ष सुरू करण्याचे नियोजन केले. पण मागील पाच वर्षांपासून ही जागा खाली करण्याबाबत सब पोस्टाकडे व त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करूनही जागा सोडली जात नसल्याने अखेर बॅंकेच्या संचालकांनी व ज्येष्ठ सभासदांनी गुरुवारी धरणे आंदोलन केले.