बीड – बीड येथील उसतोड कामगारांचे ट्रॅक्टर ट्राॅली उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दहा जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील महोळ परिसरात बुधवारी रात्री घडली. हे सर्वजण बीडच्या वडवणी तालुक्यातील वलीपुर तांड्यावरील उसतोड कामगार मजुर कर्नाटकातील नाद सहकारी साखर कारखान्याला उसतोडणीसाठी जात होते.
उषाताई संदीप पवार (वय-25, रा. टालेवाडी तांडा, ता. माजलगाव), अनिल चव्हाण (वय 2 महिने) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी आणि माजलगाव तालुक्यातील उसतोड कामगार कर्नाटकातील नाद सहकारी साखर कारखान्याला ऊस तोडणीसाठी जात होते. यावेळी सोलापुरच्या मोहोळ येथे ट्रॅक्टरच्या ट्राॅलीचे हुक तुटल्यामुळे ट्राॅली उलटली. यात दोघांचा मृत्यू तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच काहींचे हात-पाय तुटले असल्याची माहिती, उसतोड कामगार वाहन मालक संघटना अध्यक्ष कृष्णा तिडेके यांनी दिली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.