बीड : आज बीड शहर पुन्हा एकदा हादरून गेले आहे. बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. बीड भाजपा शहराध्यक्ष भागीरथ बियाणी यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ झाला आहे. दरम्यान बियाणी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
भगीरथ बियाणी हे बीड शहरातील एमआयडीसी परिसरात राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणींनी आज सकाळच्या सुमारास गोळी झाडत आत्महत्या केली. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी भगीरथ बियाणींना मृत घोषित केले.
दरम्यान, भगीरथ बियाणींनी आत्महत्या का केली? याबद्दल अद्यापही संभ्रम आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार प्रीतम मुंडे घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.