बीड – गेल्या अनेक वर्षांपासून बीडकरांचे रेल्वे मार्गाचे स्वप्न अपूर्णच आहे. मात्र, आता हे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे दिसत आहे. आता लवकरच बीडपर्यंत रेल्वे धावणार आहे. या अनुषंगाने बीडपर्यंत धावत असलेल्या रेल्वे मार्गातील विघनवाडी ते राजुरीपर्यंत रेल्वे चाचणी पूर्ण करण्यात आली आहे.
विघनवाडी ते राजुरीपर्यंत रेल्वे चाचणीच्या वेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पुढील रेल्वे मार्गाबाबत सोनवणे यांनी सूचना देखील दिल्या आहेत. शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीडजवळील राजुरीपर्यंत ही पहिली चाचणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रेल्वे कृती समितीने यासाठी खूप मोठा लढा दिला होता. आज राजुरीपर्यंत चाचणी झाली असून 26 जानेवारीपर्यंत रेल्वे बीडपर्यंत येणार असल्याचा शब्द खासदार बजरंग सोनवणे यांनी दिला आहे.
या वर्षीच्या सुरुवातीला आष्टी ते अंमळनेर या 30 किमी मार्गावर 110 किमी प्रति तास वेगाने हायस्पीड रेल्वे चाचणी देखील यशस्वी पार पडली होती. अंमळनेरमध्ये पहिल्यांदाच रेल्वे आल्याने येथील नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला होता. अनेकांनी रेल्वेच्या बोगीत बसून फोटो काढत आनंद व्यक्त केला होता. येथून बीडचे अंतर 70 किमीच राहिले होते, आता राजुरीपर्यंत रेल्वे चाचणी पूर्ण झाल्याने पुढील काही दिवसांतच बीडपर्यंत रेल्वे धावणार आहे. त्यामुळे आता बीडकरांची देखील स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात होणार आहे. आज देखील राजुरी येथे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.