बीड : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. आज उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये परळी विधानसभेसाठी अर्ज भरलेल्या करुणा मुंडे यांचा अर्ज निवडणूक आयोगाने बाद केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे परळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यांच्याविरोधात यावेळी करुणा मुंडेंनी अर्ज दाखल केला होता.
का बाद केला अर्ज?
करुणा मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून ज्या व्यक्तीचे नाव होते त्याने अर्जावरील स्वाक्षरी आपली नसल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला आहे. परळी विधानसभा मतदारसंघात 10 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. करुणा मुंडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून नाव असलेल्या व्यक्तीने स्वाक्षरी केली नसल्याचं सांगितलं, त्यामुळे तो अर्ज बाद ठरवला आहे, असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
धनंजय मुंडेंवर केला आरोप
अर्ज बाद झाल्यामुळे करुणा मुंडे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. बीडचा विकास करण्याच्या नावाखाली धनंजय मुंडेंनी पैशांची उधळपट्टी केली आहे. लोकांचे पैसे त्यांनी उडवले. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची फॅक्टरी आहे. ही घराणेशाही सुरू आहे. ती संपवण्यासाठी मी बीडमध्ये आली आहे. मी मागे विष घेण्याचा प्रयत्न केला होता. आताही त्यांना असंच वाटतंय. पण मी आता विष घेणार नाही, मी लढा देईल, अशी प्रतिक्रिया करुणा मुंडेंनी दिली आहे.