बीड- देशात आणि राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी अत्याचार केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. त्यामुळे मुंबई हादरली होती. मात्र बीडमधील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
निर्दतेचा कळस गाठणारी ही घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर तब्बल ४०० जणांनी अत्याचार केला. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हे प्रकरण उघड झालं.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील ही घटना आहे. पीडित मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत मागील सहा महिन्यात पीडितेवर ४०० जणांनी अत्याचार केला. या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलीचा तिच्या वडिलांनी एका तरुणासोबत बालविवाह करून दिलं होता. मात्र नवरा सांभाळत नसल्याने पीडिता आपल्या वडिलांकडे गेली होती.
दरम्यान वडिलांनी तिला सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे निराधार झालेली पीडित मुलगी अंबाजोगाई बसस्थानकावर येऊन राहू लागली. मात्र बसस्थानक परिसरात या एकट्या मुलीवर मागील सहा महिन्यात ४०० जणांनी अत्याचार केला.
या प्रकरणी बालविवाह लावून देणाऱ्या वडिलांसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर अत्याचार करणाऱ्या तीन संशयित आरोपींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.