बीड – जिल्ह्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यभराचे लक्ष बीड जिल्ह्याकडे लागले. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी सर्वच क्षेत्रातून दबाव वाढला.
मात्र तरीही बीडमधील गुन्हे थांबण्याचे चित्र दिसत नाही. गुरुवारी रात्री आष्टी तालुक्यातील वाहिरा नावाच्या गावात दोन सख्या भावांची जमावाने हत्या केली. या घटनेनंतर बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केल्याची माहिती मिळत आहे.
अजय भोसले आणि भरत भोसले असे मृत भावांचे नाव असून कृष्णा भोसले हा गंभीर जखमी आहे. हे तिघेही त्यांच्या गावात उभे असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले. यातील काही लोकांनी या तीनही भावांवर शस्त्राने हल्ला चढवला. मारहाण आणि खून नेमका कोणत्या कारणाने झाला? हे मात्र अद्याप समजले नसून आष्टी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे.
दरम्यान, संतोष देशमुख प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस पहिल्या दिवसांपासून आक्रमक पद्धतीने आवाज उचलत आहेत. याच सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात सदर घटना घडली आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत.