बीड – बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतानाही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या निवडीनंतर जल्लोश केल्याने पदभार घेण्यापूर्वीच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह 11 जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांचे चिरंजीव नगरसेवक आदित्य पाटील यांच्यावर ही गुन्हा दाखल झाला आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष सिता प्रदीप बनसोड, उपनगराध्यक्ष शितल पशुपतीनाथ दांगट, जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हारून चाँदपाशा इनामदार, जेष्ठ नेते अंकुश इंगळे, नगरसेवक आदित्य अशोकराव पाटील, पशुपतीनाथ दांगट, नगरसेवक सोमनाथ गुंड, सुग्रीव माणिक कराड, नगरसेविका पल्लवी ओमप्रकाश रांजनकर, नगरसेविका पदमीन गुलाब शिंदे, शकील ईनामदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
केजमध्ये भाजप पुरस्कृत स्थानिक आघाडी सत्तेत आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या मदतीने याठिकाणी स्थानिक आघाडीचा नगराध्यक्ष बनला आहे आणि याच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता. अगदी फटाके फोडून, पेढे वाटून आणि गुलाल उधळून या ठिकाणी मोठा जल्लोष करण्यात आला होता.
बीडच्या जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशाच्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी गर्दी न करण्याबाबत दिलेल्या आदेशाची मोडला आहे. केज शहरातील मंगळवार पेठ ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत गैरकायद्याचा जमाव करून 100 ते 150 लोकांना एकत्र आणले आणि विजयी मिरवणूक काढली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.