fbpx

रॉकीच्या जाण्याने आम्ही एक प्रामाणिक योद्धा गमावला – गृहमंत्री

३६५ गुन्हे उघडकीस आणणाऱ्या ‘रॉकी’ला अखेरचा निरोप

बीड – येथील पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे शनिवारी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

रविवारी बीड पोलिसांनी त्यांच्या मदतनीस रॉकीला साश्रू नयनांनी आणि सर्व सन्मानाने अंतिम  निरोप दिला.  

यावेळी शहीद श्वान सेनानीला शोकाकूल बीड पोलीस परिवाराकडून शोक सलामी देऊन भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. राॅकीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

रॉकीच्या योगदानाची दखल घेत त्याच्या निधनानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुध्दा त्यास  ट्विटरव्दारे भावपूर्ण श्रध्दाजंली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अलविदा रॉकी!
आमच्या बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे शनिवारी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.  त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

ते पुढे म्हणाले की, रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा आम्ही रॉकीच्या जाण्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी माझ्यासह बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील.

दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त इ. विषयांच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानपथक महत्त्वाची भूमिका बजावत असते.

महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.