शाखा अभियंता ठरतोय वरिष्ठांची डोकेदुखी

कार्यालयातील कागदपत्रे शाखा अभियंत्याच्या घरात

पाटण – चरेगाव-चाफळ-डेरवण -दाढोली-चोपडी-नाटोशी या जिल्हा मार्गाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या रस्त्याच्या कामाची सर्व कागदपत्रे शाखा अभियंत्याकडे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत उपअभियंता यांच्याशी संपर्क साधला असता, मीही शाखा अभियंत्याला कंटाळलो असून मलाही त्याचा त्रास होत आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे बांधकाम विभागातील मुजोर शाखा अभियंता बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची डोकेदुखी ठरत असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असणाऱ्या पाटण तालुक्‍यात दळणवळणाच्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी नेहमीच प्रयत्नशील असतात. तालुक्‍यातील जनतेला दळणवळणाच्या सोयी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने विधानसभेत आवाज उठवून लोकप्रतिनिधी तालुक्‍यात विकासनिधी आणतात. मात्र, या विकासनिधीची वासलात कशी लावली जाते, याचे उदाहरण प्रमुख जिल्हा मार्ग असणाऱ्या चरेगाव ते नाटोशी या रस्त्याच्या कामातून दिसून येत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे.

2017-18 साली या रस्त्याच्या कामाचा ठेका चचेगाव, ता. कराड येथील आर्यन कन्स्ट्रक्‍शन कंपनीने घेतला होता. 21/400 ते 38/00 किमीपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम 76 लाख 41 हजार 496 रुपयांना या ठेकेदार कंपनीला देण्यात आले होते. या रस्त्याची विशेष दुरुस्ती चार महिन्यांत करण्यासाठी ठेकेदार कंपनीला सांगण्यात आले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही संबंधित कंपनीने रस्त्याचे कोणतेच काम केले नव्हते.

त्यानंतर या रस्त्यावर काम झाले नसतानाच 57 लाख 18 हजार रूपये बांधकाम विभागाने संबंधित कंपनीला दिले. या रस्त्याच्या कामाची सर्व कागदपत्रे पाटणच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांकडे मागितली असता, ती सर्व कागदपत्रे शाखा अभियंत्याकडे असल्याचे उपअभियंता पाटील यांनी सांगितले.

वास्तविक पाहता संबंधित रस्त्याच्या कामाची सर्व कागदपत्रे उपअभियंता, बांधकाम उपविभाग, पाटण यांच्या कार्यालयात असणे गरजेचे होते. मात्र, शाखा अभियंत्याकडे ही कागदपत्रे कशीआली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काम न करताच या रस्त्यावरील निधी लाटला गेल्याचा आरोप होत असून या कामातील पुरावा म्हणून असणारे कागदपत्रे नष्ट करण्याचा डाव शाखा अभियंत्याचा आहे का, हा प्रश्‍नही निर्माण झाला आहे.

याबाबत बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. व्ही. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित शाखा अभियंता या रस्त्याच्या कामाबाबत काहीही सांगत नाही अथवा कसलीही माहिती देत नसल्याचे त्यांनी सांगितले.
एवढेच नव्हे तर शासनाला या रस्त्याच्या कामाची माहिती कळवायची असल्यास माझ्याकडे कागदपत्रे उपलब्ध नसल्याने मलाही अडचणी येत असल्याचे सांगत शाखा अभियंत्याचा मलाही त्रास होत आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. व्ही. पाटील यांनी दिली.

त्यामुळे ठेकेदाराला हाताशी धरून कारभार करणाऱ्या शाखा अभियंत्याची डोकेदुखी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही झाल्याने बांधकाम विभाग या शाखा अभियंत्यापुढे हतबल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाटण तालुक्‍यात रस्त्यांची अनेक कामे सुरू आहेत. काही मंजूरही आहेत. परंतु या रस्त्याप्रमाणेच कामकाज झाल्यास रस्त्यांच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्‍त होत आहे. याबाबत विभागाकडून योग्य कार्यवाही करण्याची अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.