कामे केली म्हणूनच दुसऱ्यांदा निवडून आलो

श्री. छ. उदयनराजे भोसले : कुंभारगावात प्रचार सभा

कुंभारगाव –
जनतेच्या विश्‍वासाला पात्र राहिलो, म्हणूनच जनतेने खासदार म्हणून वाढीव मतांनी पुन्हा संधी दिली. मी विकासकामेच केली नसती तर दुसऱ्यांदा निवडूनच आलो नसतो. मी काहीच कामे केली नाहीत, असे तुणतुणे वाजवणाऱ्यांनी मी केलेल्या 18 हजार 125 कोटी 74 लाखांच्या कामाची माहिती घ्यावी, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

कुंभारगाव, ता. पाटण येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, संजय देसाई, राहुल चव्हाण, प्रतापराव देशमुख, वंदनाताई आचरे, भालेराव सावंत, जे. पी. पाटील, संगीत गुरव, पोपटराव पाटील, सुनिल काटकर, डॉ. चंद्रशेखर घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. संसद सदस्यास मतदारसंघात विकासकामांसाठी दरवर्षी पाच कोटी निधी असतो. त्या हिशोबाने विचार करता या पाच वर्षात किमान 25 कोटी मी मतदारसंघात विकास कामांसाठी खर्च केले आहेत. असे असतानाही खोटं बोल, पण रेटून बोल, अशा पद्धतीने माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांच्या वल्गनांनवर जनता कधीच विश्‍वास ठेवणार नाही.

लोकशाहीने प्रत्येकाला मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार कोणीही निवडणुकीस उभे राहू शकते. मात्र, लोकशाहीत काही संकेतही पाळायचे असतात. विरोधक नव्यानेच रणांगणात उतरल्याने त्यांना व्यक्तीगत टिका करण्याशिवाय काहीच सुचत नाही. जनतेमुळेच मी या पदावर आहे. त्यामुळे मला मिळणारा खासदार निधी विकासांवर खर्च करत असतोच. मात्र त्याबाबत खोटी माहिती जनतेत पसरविण्याचा उद्योग विरोधकांनी करु नये. विक्रमसिंह पाटील, हिंदूराव पाटील, राहुल चव्हाण, सत्यजितसिंह पाटणकर यांचीही यावेळी भाषणे झाली. पंचक्रोशीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.