“एअर स्ट्राइक’मुळे जगाने भारताचा स्वाभिमान पाहिला

खासदार आढळराव पाटील ः पंतप्रधान मोदी व मनमोहन सिंग सरकारचा हाच फरक

शेलपिंपळगाव – गेल्या 10 वर्षांत मनमोहनसिंग सरकारला जे जमले नाही ते नरेन्द्र मोदीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने केले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, पुलवामा हल्ल्यात 40 जवानांचा बळी गेल्यावर पंतप्रधान मोदींना हवाईदलाला आदेश देऊन एअर स्ट्राईक केला. आपल्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत शिरून 300 अतिरेक्‍यांचा खातमा केला. पण मुंबईत अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी हल्ला करून 150-200 नागरिकांचा बळी घेतला. त्याचा बदला घेण्याची हिंमत कॉंग्रेसच्या पंतप्रधानांनी दाखवली का? उलट अतिरेकी कसाबला बिर्याणी खायला घातली.

आज पंतप्रधान मोदींनी जे धाडस दाखवले त्यामुळे जगात भारताची मान उंच झाली. जगाने भारताचा स्वाभिमान पाहिला, अशा शब्दांत शिवसेना- भाजप- रासप-आरपीआय- शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पंतप्रधान मोदी आणि मनमोहन सिंग यांच्या राजवटीतील फरक स्पष्ट केला. आज आपल्या प्रचारार्थ खासदार आढळराव पाटील यांनी खेड तालुक्‍याचा दौरा केला. त्यावेळी रासे येथे ते बोलत होते. सकाळी 9 वाजता कडाचीवाडी येथून सुरू झालेल्या या प्रचार दौऱ्यात आमदार सुरेश गोरे, जिल्हाप्रमुख राम गावडे, अशोक खांडेभराड, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, गणेश सांडभोर, रामदास धनवटे, किरण मांजरे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे आदी सहभागी झाले होते.

आजच्या दौऱ्यात खासदार आढळराव पाटील यांनी कडाची वाडी, रासे, भोसे, शेलगाव, वडगाव घेनंद, केळगाव, चिंबळी, चऱ्होली, धानोरे, सोळू, गोलेगाव, पिंपळगाव, मरकळ, कोयाळी तर्फे चाकण या गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. ठिकठिकाणी ग्रामस्थ व महिलांनी त्यांचे औक्षण करून वाजतगाजत मिरवणूक काढून स्वागत केले.
आढळराव म्हणाले की, डॉ. कोल्हे सांगतात मी शेतकरी कुटुंबातून आलो. आमच्या वाडवडिलांचाही बैलगाडा होता. मग बैलगाडा शर्यतींवर बंदी आली तेव्हा तुम्ही काय करीत होता? तमिळनाडूमध्ये जलीकट्टू शर्यतींवर बंदी आली तेव्हा दक्षिणेतल्या फिल्म इंडस्ट्रीतले कमल हसनपासून सगळे आघाडीचे कलाकार उपोषणाला बसले होते.

तुम्ही कधी बैलगाडा आंदोलनात सहभागी झाला का? बैलगाडा शर्यतबंदी आंदोलनात माझ्यावर केसेस झाल्या, तेव्हा मी काय केलं हे विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, आमिर खान यांच्यासारख्या अभिनेत्यांनी नाम फाऊंडेशन, पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी काम केलं. मग अभिनेता म्हणून तुम्ही समाजासाठी काय केलं? असा सवाल आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला केला.

तुमचा खासदार म्हणून काम करताना गेल्या पाच वर्षांत पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसारखा 7500 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करुन आणला. नाशिकफाटा ते चांडोली या टप्प्याचे सहापदरीकरण असेल, राजगुरुनगर ते सिन्नर टप्प्याचे चौपदरीकरण असेल जवळपास 14 हजार कोटींची विकासकामे केली. लोकांची कामे करताना प्रकृतीची तमा न बाळगता सतत लोकांना भेटत राहिलो. माझ्या इतका गावागावात लोकसंपर्क यापूर्वी कुठल्या खासदाराने ठेवला होता का? उलट स्वातंत्र्यानंतर खासदार कसा असतो हे तुमच्या रुपाने आपण पहिल्यांदा पाहिला अशी भावना लोकं बोलून दाखवतात.

आढळराव दादांनी जनतेची कामे करताना कधीच जातपात पाहिली नाही. त्यांनीच खऱ्या अर्थाने माळी समाजाला न्याय मिळवून दिला. उलट राष्ट्रवादी कॉंग्रेसने सतत माझ्यावर अन्याय केला. आता निवडणुका आल्यावर त्यांना माळी समाजाची आठवण झाली; मात्र खेड तालुक्‍यातील माळी समाज खासदार आढळराव दादांच्या पाठीशीच उभा राहिल. खेड तालुक्‍यातील जनतेने दादांवर आणि दादांनी येथील जनतेवर खूप प्रेम केले. प्रत्येक निवडणुकीत आपण खेडच्या जनतेच्या बळावर निवडून आलो असे दादा अभिमानाने सांगत असतात, ही खेडच्या जनतेच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे. त्यामुळे यापूर्वी जसे आढळराव यांना मताधिक्‍क्‍य दिलेत तसेच यावेळीही द्या.

-सुरेश गोरे, आमदार खेड

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.