उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; दलित नेत्या बेबीरानी मौर्य यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी

आग्रा – भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून उत्तराखंडच्या राज्यपाल बेबीराणी मौर्य यांना राज्यपालपदाचा राजीनामा देण्यास सांगून त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करणे हा पक्षाच्या व्यापक निवडणूक रणनीतीचा भाग मानला जातो.

पंजाबमध्ये काँग्रेसने चरणजितसिंग चन्नी यांच्या रुपाने मुख्यमंत्रिपदी दलित व्यक्तीची निवड केल्याने त्याचा उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन भाजपने आग्रा येथील बेबीराणी मौर्य यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड केली आहे. आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्यावर आणखी जबाबदारी दिली जाऊ शकते.

65 वर्षीय मौर्य यांच्यामागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. एका सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी भाजपचे काम सुरु केले होते. 1995 मध्ये त्या भाजपच्या तिकीटावर आग्र्याच्या पहिल्या दलित महापौर बनल्या. महापौर म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केले. 

2002 ते 2005 या कालवधीत त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगावर सदस्य म्हणून काम केले. 2007 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील एतमादपूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा विजय थोड्या मतांनी हुकला होता. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची उत्तराखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील जातींची समीकरणे, दलित मतांचे राजकारण या सगळ्यांचा विचार करून भाजपने त्यांना तातडीने राज्यपालपदाचा राजीनामा देऊन त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड केल्याने यामागे भाजपची दूरदृष्टी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

आग्रा ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवण्याचे

भाजपचे नियोजन असल्याचे सांगण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री निवडण्याची जी पद्धत आहे ती पाहता उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची पुन्हा सत्ता आल्यास राज्यात धक्कादायक नवा चेहरा मुख्यमंत्री म्हणूनदिला जाऊ शकतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.