भाटघर (पुणे) – भोर-कापूरहोळ रस्ता कॉसमॉस फुलांनी बहरलेला आहे. या रस्त्यावरून प्रवास करीत असताना ही फुले लक्ष वेधून घेत आहेत. रस्त्याच्या शेजारील पडीक शेतीही या फुलांनी बहरलेली आहे. या भागात प्रवास करणाऱ्यांमध्ये ही फुले आकर्षणाचा विषय ठरत आहे.या फुलांमुळे नेकलेस पॉईंट, भाटघर धरणाच्या भिंती शेजारील परिसरतील रस्त्याला आगळेवेगळे सौंदर्य निर्माण झाले आहे.
दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये ही फुले उमलतात. किमान अडीच ते तीन महिने भोर-कापूरहोळ रस्ता या फुलांनी बहरलेला दिसतो. आजूबाजूच्या पडीक शेतामध्येही ही फुले दाटीवाटीने फुललतात. यामुळे या परिसराला एक सौंदर्य निर्माण झाले आहे.
या फुलांच्या झाडांच्या रोपांची उंची एक ते सहा फुटाच्या दरम्यान असते. फुलांना आठ पाकळ्या असतात. या फुलांच्या कार्यकाळादरम्यान दसरा व दिवाळी हे दोन प्रमुख सण येतात. निसर्गाने फुलवलेल्या या फुलांच्या सौंदर्यामुळे या दोन्ही सणांच्या काळात केशरी सडा घातल्यासारखे सुंदर वातावरण निर्माण झालेले दिसून येते.
मात्र, या सणांच्या वेळी या फुलांचा वापर न करता झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. यामुळेही फुले फुकट मिळत असतानाही कुणीही वापर केल्याचे दिसून येत नाही. यामुळे बाजारातही फुले विक्रीस दिसून येत नाहीत.