मुंबई : ‘खुबसुरत’ सिनेमातील जगन गुप्ता या भूमिकेने लोकप्रिय झालेले अभिनेते रणजित चौधरी यांचे निधन झाले असून निधनसमयी त्यांचे वय 64 होते. रणजित चौधरी यांचं निधन कोणत्या कारणामुळे झाला याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बासु चॅटर्जी यांच्या ‘खट्टा मीठा’ सिनेमात त्यांनी पदार्पण केलं होतं. या सिनेमात त्यांनी अभिनेता अशोक कुमार यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमांतील त्यांचा अभिनय प्रेक्षकांनी पसंत केला होता. तसेच ‘बातों बातों मे’ आणि ‘खुबसुरत’ सिनेमातही त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.
बॉलिवूडबरोबरच रणजीत यांनी हॉलिवूडमध्ये देखील आपलं नशिब अनुभवलं होतं. हॉलिवूडमधील एक लोकप्रिय चेहरा अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. आतापर्यंत त्यांनी 40 सिनेमांत भूमिका साकारल्या. तसेच कॉमेडी रोलमध्ये दिसून आले आहेत. सिनेमासह रणजीत चौधरी यांनी “द ऑफिस’ सारख्या टीव्ही मालिकांमध्ये देखील अभिनय केला होता. मुंबईच्या नाट्यसृष्टीतील दिग्गज अभिनेते पर्ल पदमसी हे त्यांचे वडील होत.
वर्ष 1980 मध्ये रणजित चौधरी अमेरिकेला गेले आणि तेथे त्यांनी हॉलिवूडच्या अनेक सिनेमांत भूमिका केल्या. त्यात “मिसिसिपी मसाला’, “फायर’, “कामसूत्रा – ए टेल ऑफ़ लव’, “सच ए लॉंग जर्नी’, “बॉलीवुड/हॉलीवुड’ आणि “ब्रेकअवे’ अशा सिनेमांचा समावेश आहे. तसेच अनेक चित्रपटांसाठी कथा-संवाद लेखनही केले. रणजित यांच्या निधनाची बातमी त्यांची सावत्र बहिण रायल पदमसी यांनी इन्स्टाग्रामद्वारे प्रसिद्ध केली.