‘जय श्रीराम’चा नारा देण्यासाठी तरुणाला मारहाण

औरंगाबादमधील दुसरी घटना
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा जय श्रीराम चा नारा देण्यासाठी तरुणांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शहरातील आझाद चौकात अज्ञात तरुणांनी झोमॅटोच्या दोन कामगारांना जय श्रीरामचे नारे देण्यासाठी दबाव टाकला. एवढेच नाही तर मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, औरंगाबादमधील एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

औरंगाबादमध्ये काल मध्यरात्री दहा ते बारा जणांच्या टोळक्‍याने आझाद चौकात झोमॅटोच्या कामगारांना अडवले. तसेच त्यांना जय श्रीराम चे नारे देण्यासाठी दबाव टाकत बेदम मारहाण केली. मात्र, यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. सिडको पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत.

दरम्यान, औरंगाबादमध्ये मागील गुरूवारीदेखील असाचा प्रकार घडला होता. कामावरून घरी जाणाऱ्या मुस्लिम तरुणास अडवून मारहाण करत त्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली होती. शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगराता गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. इम्रान पटेल असे पीडित तरुणाचे नाव आहे. बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.