महिलेला मेसेज करतो म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यास मारहाण

पिंपरी (प्रतिनिधी) – माझ्या बायकोला मेसेज का करतो, असे म्हणत महावितरणच्या अधिकाऱ्याचे अपहरण करीत त्यांच्याच कुटूंबासमोर महिलेसह तिघांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी घडली.

विक्रांत माधव वरूडे (वय 39, रा. तुकाईनगर, दिघी रोड, भोसरी) यांनी याबाबत शनिवारी (दि.7) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैशाली भालेकर, तिचा नवरा आणि ज्ञानेश्‍वर जाधव (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरूडे हे महावितरणमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास वरूडे हे महावितरणच्या थरमॅक्‍स चौकातील कार्यालयात काम करीत होते. त्यावेळी त्यांच्या कार्यालयात महिलेसह तिघेजण आले. त्यांनी वरूडे कोण आहेत, अशी विचारणा केली. फिर्यादी यांनी आपण वरूडे असल्याचे सांगितल्यावर आमच्या बरोबर बाहेर चला, असे त्यापैकी एकजण म्हणाला. तुमचे काय काम आहे ते इथेच बोला, असे वरूडे म्हणाले. येथे मोठा राडा होईल, असे आरोपीने सांगितल्यावर वरूडे कार्यालयाबाहेर आले.

मी वैशाली भालेकरचा नवरा आहे. तू माझ्या पत्नीला फोन आणि व्हॉटस्‌ऍप मेसेज का करतो? अशी विचारणा करीत शिवीगाळ व हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. दुसऱ्या आरोपीने माझे नाव ज्ञानेश्‍वर जाधव असून मी वैशालीचा भाऊ आहे, असे सांगत त्यानेही शिवीगाळ करीत फिर्यादी यांचे हात धरून ठेवले. त्यानंतर आरोपींनी वरूडे यांना करड्या रंगाच्या मोटारीत जबरदस्तीने बसवून पुन्हा मोटारीत शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर वरूडे यांना महावितरणच्या मोशी येथील कार्यालयात नेऊन वैशाली भालेकर हिने देखील शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. सुरक्षा रक्षक पळसकर याच्यासमोर आरोपींनी मोटारीतील काठीने मारहाण केली. आरोपी जाधव याने लाथा-बुक्‍क्‍यांनी चेहरा व डोळ्यावर मारहाण केली.

त्यानंतर आरोपींनी पुन्हा वरूडे यांना मोटारीत बसवून तुझ्या घरच्यांसमोर तुझी इज्जत काढतो, असे म्हणत फिर्यादी वरूडे यांच्या आई व बहिणीसमोर पुन्हा शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली. पुन्हा असे केले तर सोडणार नाही, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.