पुणे – भाव विचारून दुसऱ्या विक्रेत्याकडून भाजी खरेदी केल्याने भाजी विक्रेत्याने ग्राहकाला मारहाण केली. ही घटना बी. टी. कवडे रस्त्यावर घडली. भाजी विक्रेत्याने ग्राहकाच्या तळहातावर चाकुने वार केला. याप्रकरणी भाजी विक्रेत्यावर वानवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
दिनेश जयेंद्र प्रसाद (वय 34, सध्या रा. घोरपडी) याने यासंदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अब्दुल नावाच्या एका भाजी विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उदय बाग परिसरातील पदपथावर अब्दुल नावाचा भाजी विक्रेता आहे.
दिनेश त्याच्याकडे भाजी खरेदीसाठी गेला. त्याने भाजीचे भाव विचारले. भाव जास्त वाटल्याने त्याने शेजारी असलेल्या भाजी विक्रेत्याकडे चौकशी केली आणि त्याच्याकडून भाजी खरेदी केली.
भाव विचारून दुसऱ्या भाजी विक्रेत्याकडून भाजी खरेदी केल्याने अब्दुल चिडला. त्याने दिनेशला मारहाण केली. अब्दुलने दिनेशच्या तळहातावर चाकुने वार केले. मारहाणीत दिनेश जखमी झाला. त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. भाजी विक्रेता अब्दुल पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.