-->

गर्भवतीला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

- नऊ जणांवर गुन्हा - भिगवणच्या मदनवाडीतील घटना

भिगवण – मदनवाडी (ता. इंदापूर) येथील एका गर्भवती महिलेचा मानसिक, शारीरिक छळ करत झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. याबाबत सासरच्या नऊ जणांवर विवाहितेचा छळ तसेच जीवे मारण्याच प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साजन नितीन भोसले (वय 23) असे मृत गर्भवती महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत महिलेची आई संतोषी काळे (रा.खंडोबानगर, बावडा, ता. इंदापूर मूळ चिपळूणकर बाग, सातारा) यांनी भिगवण पोलिसांत फिर्याद दिली.

भिगवण पोलिसांनी नितीन मच्छिंद्र भोसले (मृत महिलेचा पती), मच्छिंद्र भोसले (सासरा), औरंगाबाद मच्छिंद्र भोसले (सासू) स्वप्निल मच्छिंद्र भोसले, नाजुका नितीन भोसले, काळू बाटल्या पवार (मामा), शेजारी राहणारे अनिल पांडुरंग काळे, दया अनिल काळे व पवन भोसले (सर्व रा. मदनवाडी, ता. इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.

मदनवाडी येथे फिर्यादीची मुलगी साजन नितीन भोसले हिला तिच्या सासरच्यांनी संगनमताने हाताने, लाथा, बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच तू आमच्या येथे राहू नको, येथून निघून जा. नाही गेली तर तुला सोडणार नाही, जिवे मारून टाकू, असे म्हणून फिर्यादीची मुलगी साजन हिला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर महिलेस रुग्णालयात दाखल केले असता, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने व पोलिस उपनिरीक्षक दडस पाटील करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.