पिंपरी – सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याच्या कारणावरून तरुणास हातोड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना विशाल नगर, पिंपळे निलख येथे रविवारी (दि. 16) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. सुयोग गोविंद भापकर (वय 24, रा. भुजबळ वस्ती, वाकड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने रविवारी (दि. 16) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन वाघमारे (वय अंदाजे 40, पत्ता माहिती नाही) असे आरोपीचे नाव आहे. रविवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी भापकर हे चिकन आणण्यासाठी गेले होते. ते विशालनगर येथील एका चिकन शॉपच्या समोर थुंकले. या कारणावरून चिडलेल्या आरोपी सचिन वाघमारे याने भापकर याला शिवीगाळ करुन हातोड्याने मारहाण केली.