दानिशप्रकरणी मियॉंदाद-कांबळीमध्ये चकमक

कराची – पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याला हिंदू असल्यामुळे देण्यात आलेल्या वागणुकीसंदर्भात आता पाकिस्तानचा माजी कर्णधार व चिथावणीखोर वक्‍तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जावेद मियॉंदाद आणि भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यात चकमक उडाली आहे.

जावेदने म्हटले आहे की, दानिशबाबत धर्मावरून दुजाभाव केला असता, तर तो पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा दहा वर्षे सदस्य राहिला नसता. तर दुसरीकडे निवृत्त भारतीय सलामीवीर विनोद कांबळीने मियॉंदादची नको तिथे नाक खुपसण्याची सवय गेली नसल्याचे म्हटले आहे.

कालच माजी कर्णधार इंझमाम उल-हकने माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला खोटे ठरवले नसले, तरी दानिशसोबत संघातील खेळाडूंनी दुजाभाव केला नसल्याचे सांगितले आहे. या एकूणच प्रकरणात रोज नवे खुलासे येत आहेत
पाकिस्तानकडून खेळताना दानिश सर्वाधिक काळ माझ्या नेतृत्वाखाली खेळला आहे आणि मला वाटत नाही की संघातील खेळाडूंनी कधी त्याच्यासोबत असा व्यवहार केला असेल. तो गैरमुस्लीम आहे म्हणून त्याच्यासोबत कोणी चुकीचे वागले नाही. दानिश हिंदू होता म्हणून त्याच्यासोबत कोणी जेवत नव्हते, असा गौप्यस्फोट माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने केला होता. त्यावर इंझमामने कालच स्पष्टीकरण दिले होते. शोएबने केलेल्या गौप्यस्फोटानंतर दानिशने देखील संघातील काही खेळाडू मला वेगळं पाडत असल्याचे सांगितले होते. पाकिस्तानी लोकांचे मन छोटे असते, असे दानिश म्हणाला होता.

कांबळीने मियॉंदादला कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ‘भारत सुरक्षित नाही, त्यामुळे ‘आयसीसी’ने अन्य देशांतील क्रिकेट संघाना भारताचा दौरा करण्यापासून रोखावे, असे मियॉंदाद म्हणाला होता. त्यावर ‘मियांदादची जुनी खोड अजून मोडलेली नाही,’ असा टोला कांबळीने लगावला.

कांबळी लिहितो, ‘मियॉंदाद, तुमची जुनी खोड गेलेली नाही. रिटायरमेंटनंतरही तुमची सवय सुरूच आहे. आमचा देश सुरक्षित आहे. तुम्ही हे पाहा की कोणता अन्य देश आता पाकिस्तानात येऊ इच्छितो.’

शोएबचा “रिव्हर्स स्विंग…’
हिंदू असल्यामुळे दानिश कनेरियासोबत कोणी जेवण्यास बसत नसे, असे वक्‍तव्य करून खळबळ उडवणाऱ्या शोएब अख्तरने आता रिव्हर्स स्विंग (यू-टर्न) घेतला आहे. पाकिस्तानच्या माजी जलदगती गोलंदाजाने दानिश संदर्भात केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. माझ्या वाक्‍याचा चुकीचा अर्थ घेतला गेला, असे शोएबने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.