ओतूरजवळ नगर-कल्याण महामार्गावरील अपघात
ओतूर – ओतूर(ता.जुन्नर) हद्दीतील नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या महार्गावर उभ्या असलेल्या मॅक्सिमो (एम.एच.१४ डी.एन. ५६२५) गाडीला डबलसीट असलेल्या दुचाकीने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला.
अपघात झाल्यावर स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.यादवराव शेखरे यांनी एक जण मृत झाल्याचे घोषित केले व गंभीर जखमी युवकांस प्रथमोपचार करुन पुढील उपचारार्थ आळेफाटा येथे पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. मात्र मृत झालेली व्यक्ती व जखमी व्यक्तींची ओळख उशिरापर्यंत मिळू शकली नाही.
ओतूर पोलिसांना अपघाताची खबर मिळताच अपघातस्थळी व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पोलिस पोहोचले व अपघातग्रस्त युवकांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.