कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग धंदे बंद पडले होते. त्यामुळे लॉकडाउन उठल्यानंतर जर तुम्ही केस कापण्यासाठी किंवा दाढी करण्यासाठी सलून मध्ये गेलात तर तुम्हाला आता दुप्पट, तिप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दरवाढीनुसार, केस कापण्यासाठी आता 100 ते 120 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 60 ते 80 रुपये घेण्यात येत होते. त्याचप्रमाणे दाढी करण्यासाठी देखील 40 ते 50 रुपयांऐवजी 80 रुपये द्यावे लागणार आहेत.
यादरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेत पीपीई किट चा वापर व्यावसायिकांना करावा लागणार आहे. सलून व्यावसायिकांना गेल्या 3 महिन्यांपासून व्यवसाय ठप्प पडल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशातच आता सर्व खबरदारी घेऊन त्यांना ग्राहकांना सेवा पुरवावी लागणार आहे. परंतु वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.