बीच प्लिज…!

गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर मल्हार कळंबे या 21 वर्षीय मुंबईकर तरुणाच्या मुंबईतील समुद्र किनारे साफ करण्याच्या प्रेरणादायी मोहिमेबद्दल वाचले. केवळ 21 वर्षांचा असणाऱ्या मल्हारला त्याच्या सामाजिक कार्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाकडून गौरविण्यात आले असून मल्हारने 10 सप्टेंबर 2017 पासून दादरचा समुद्र किनारा कचरा मुक्त करण्याची सुरु केलेली मोहीम आजपर्यंत अविरत सुरु आहे. तसं पाहायला गेलं तर समुद्र किनारे असोत वा नदी-नाले पाण्याच्या अशा सर्वच नैसर्गिक संस्थांना मानवनिर्मित कचऱ्याचे ग्रहण लागले आहे.

समुद्र किनाऱ्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, नद्यांची झालेली गटारगंगा, गावातल्या तलावांची नागरिकांनी केलेली कचराकुंडी हे चित्र आता तुमच्या माझ्यासारख्यांसाठी एरवीच झालं असल्याने कदाचित आपल्या पर्यावरणाच्या बाबतीतील संवेदना बोथट झाल्या आहेत. मात्र आपण ज्या निसर्गाच्या सानिध्यात राहतो त्या निसर्गाप्रती आपली देखील काही जबाबदारी आहे असं मानणारी लोकं देखील आपल्या अवतीभोवती वावरत असतात. मग याच सजग लोकांच्या कार्यातून समाजामध्ये क्रांती घडत असते. अशाच क्रांती घडवणाऱ्या आणि इतरांसाठी प्रेरणा ठरणाऱ्या कथा आहेत उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर जिल्ह्यातील एका खेड्यात राहणाऱ्या रामवीर तंवर आणि मुंबईत राहणाऱ्या मल्हार कोळंबे यांच्या.

रामवीर तंवर हा मूळचा उत्तर प्रदेशातील एका खेड्यात लहानाचा मोठा झालेला तरुण. हातात इंजिनीयरिंगची डिग्री आणि चांगल्या पॅकेजचा जॉब असतानाही रामवीरने त्याच्या गावातील कचराकुंडी झालेल्या तळ्याला पुनर्जीवन देण्याचा निर्णय घेतला. लहानपणी ज्या तळ्यामध्ये रामवीर आणि त्याचे सवंगडी पोहण्याचा आनंद घ्यायचे त्या तळ्याची झालेली कचराकुंडी रामवीरला नेहमी विचलित करीत असे. आपण आपल्या लहानपणी ज्या गोष्टींचा आनंद घेतला त्या गोष्टी आपल्या येणाऱ्या पिढयांना पाहायला तरी मिळतील का? असा विचार करत रामवीरने आपल्या गावातील तळ साफ करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला लोकांमध्ये जाऊन त्यांना पाण्याच्या या स्रोताच महत्व पटवून देत रामवीरने गावकऱ्यांची मदत तर मिळवलीच मात्र त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे गावचं तळ म्हणजे आपली संपत्ती आहे अशी भावना गावकऱ्यांमध्ये निर्माण करण्यातही तो यशस्वी झाला. हे काम करताना त्याला असंख्य अडचणी आल्या पण तो मागे हटला नाही. रामवीरच काम पाहून शेजारच्या खेड्यापाड्यातील लोक त्यांच्या गावातील तळी पुनर्जीवित करण्यासाठी रमवीरकडे सल्ला मागू लागली. रामवीरने आतापर्यंत 10 तळ्यांना पुनर्जीवित केले असून त्याचे हे कार्य अविरत सुरु आहे.

2017मध्ये इंडोनेशियातील बाली इथं पर्यटनासाठी गेला असता मूळचा मुंबईचा असणारा मल्हार कोळंबे तेथील समुद्र किनाऱ्यांवर असलेल्या स्वच्छतेने भलताच भारावून गेला. भारतात परतल्यावर तो आपल्या आईला मुंबईतील अस्वच्छ समुद्र किनारे आणि परदेशातील स्वच्छ समुद्र किनारे याबाबत सांगायला लागला असता त्याच्या आईने त्याला केवळ तुलना करत बसण्यापेक्षा आपल्याकडील समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी काहीतरी करण्याचा सल्ला दिला. आणि यातूनच सुरु झाली ‘बीच प्लिज’ मोहीम. 2017मध्ये मुंबईतील दादरचा समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी सुरु केलेली ही मोहीम आजतागायत सुरु असून या मोहिमेद्वारे आतापर्यंत 1000 टन कचरा गोळा करण्यात आला आहे. मल्हारने सुरुवातीला आपल्या काही मित्रांसोबत सुरु केलेली ही मोहीम आता व्यापक बनली असून जवळपास 20000 मुंबईकर या मोहिमेत काम करत आहेत.

रामवीरची “सेल्फी विद पॉन्ड’ असोत अथवा मल्हारची ‘बीच प्लिज’ दोघांच्याही मोहिमांमध्ये एक समान धागा प्रकर्षाने जाणवतो आणि तो म्हणजे या दोघांनीही “कोणीतरी करेल…’ याची किंचितही वाट पहिली नाही. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या निसर्गाची जबाबदारी आपल्यावर देखील आहे याचीच जाण राखत त्यांनी काम तर केलंच मात्र त्याहूनही महत्वाचं म्हणजे तुमच्या माझ्यासारख्यांसाठी ते एक प्रेरणा देखील बनले!

– प्रशांत शिंदे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.