पुणे : लवकरच आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. त्याची उत्सुकताही सर्वानाच लागलेली आहे. परंतु आपला बाप्पा कसा पर्यावरण पुरक असेल याचाही आपण विचार करणे गरजेचे आहे. कारण प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवललेल्या मूर्ती पासून नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. हे प्रदूषण रोखने आणि पर्यावरण पूरक मूर्ती बनवून पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्याची गरज आता निर्माण झाली आहे. त्यासाठी “दैनिक प्रभात” च्या माध्यमातून अतिशय उत्तम संधी आपणा सर्वांसाठी उपलब्ध झालेली आहे. अगदी मोफत मूर्ती बनवण्याची कार्यशाळा “दैनिक प्रभात”च्या व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच मागील काही दिवस शहरातील विविध भागांमधील अनेक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील प्रभातने या कार्यशाळे मार्फत मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिलेले आहे.
या संदर्भात शिल्पकार नितीन ठाकरे यांनी अतिशय सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. या पद्धतींचा वापर करून तुम्ही सहज मूर्ती बनवू शकता. खाली दिलेला व्हिडीओ पाहून तुम्ही आपल्या बाप्पाची सुबक आणि सुंदर मूर्ती अगदी सहजरित्या साकारू शकता. तर मग वाट कसली बघताय दिलेल्या व्हिडिओ वर लगेच क्लिक करा आणि “तुम्हीच व्हा तुमच्या बाप्पाचे शिल्पकार”.
शाडू मातीपासून पर्यावरण पूरक गणपती बनवण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की, शाडूमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे ही लहान मुलांसाठी आनंदाचीच गोष्ट आहे. इतकेच नव्हे तर साध्या मातीचीही मूर्ती तयार करता येते. यासाठी वेगळे विशेष साहित्य लागत नसल्याने अबालवृद्धांपासून सर्वांनाच ही मूर्ती तयार करता येते. प्लॅस्टर ऑफ पॅरिस नदीत विरघळत नसल्याने त्याचा त्रास आपल्यालाच होतो. याउलट, शाडू किंवा साध्या मातीच्या मूर्तीचे बादलीत विसर्जन करून ते पाणी बागेसाठी वापरता येते किंवा या मातीची परत पुढल्यावर्षी मूर्ती तयार करता येते. अशा प्रकारे एकही वस्तू वाया न घालवता, कसलाही कचरा न होता या मूर्ती करता येतात.